मराठी साहित्य संमेलन प्रत्येकाला आपले वाटले पाहिजे'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

कल्याण - आजच्या काळात साहित्य संमेलन लोकांचा उत्सव झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला संमेलन आपले वाटावे, असाच विचार अखिल भारतीय साहित्य महामंडळ करत असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी "सकाळ‘ला दिली. 

कल्याण - आजच्या काळात साहित्य संमेलन लोकांचा उत्सव झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला संमेलन आपले वाटावे, असाच विचार अखिल भारतीय साहित्य महामंडळ करत असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी "सकाळ‘ला दिली. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आतापर्यंत झालेल्या वाटचालीबद्दल मत व्यक्त करताना ते म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथकारांचा मेळावा या कल्पनेतून झाली; मात्र काळाच्या ओघात त्यात अनेक घटक जोडले गेले आहेत. यात विक्रेते, प्रकाशक, गर्दीचा फायदा घेणारे राजकारणी आणि समाज समाविष्ट झालेत. त्यामुळेच आज प्रत्येकाला हे अखिल भारतीय मराठी संमेलन आपलेसे वाटते हे नाकारता येणार नाही. संमेलन हे साहित्य पर्यटन म्हटले तरी वावगे ठरू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलन हा मेळावा असतो. त्या मेळाव्यातून आनंद कसा मिळेल हे महत्त्वाचे असते, असेही मत जोशी यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलन कोणत्या गावात होणार आहे किंवा होत आहे, हा मुद्दा गौण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संमेलन आयोजकांचे आयोजन किती सक्षम आणि समर्थ आहे, यावर संमेलन स्थळ ठरते. ज्या गावात संमेलन होते तेथील कार्यकर्त्यांना या संमेलनाच्या निमित्ताने संधी मिळते हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते मत माझे नव्हतेच
संमेलन स्थळासाठी आपला कल बेळगावकडे होता, असे वृत्त काही वर्तमानपत्रांमध्ये छापून आले होते; मात्र प्रत्यक्षात मी असे कधीच म्हणालो नव्हतो. आता झाले ते झाले. माझ्या दृष्टीने हा विषय संपला असल्याने त्यावर माझे विचारच जिथे मांडले नव्हते तिथे हा कल कसा समजला? असो हा विषय आता संपला असून, त्यावर वृथा चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी मनगोत व्यक्त केले.