मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनाही सोशल मीडियाची भीती !

राजेभाऊ मोगल
रविवार, 22 एप्रिल 2018

संवाद आणि नजरानजर होताच हशा पिकला 
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, की बाळासाहेब पवार हे आव्हान देऊन बंड करायचे. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची झोप उडायची. हा इतिहास आहे. चांगल्या अर्थाने सांगतो, असे म्हणत जर आज बाळासाहेब असते तर...? आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेला नजर दिली. हा संवाद आणि नजरानजर पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

औरंगाबाद - अलीकडच्या काळात मने संकुचित झाली आहेत. स्पष्टपणे बोलण्याची सोय राहिली नाही. अनेकवेळा लोक म्हणतात, भाषणे रंगत नाहीत. रंगतील कसे? काहीही अर्थ काढले जात असल्याने भाषणामध्ये विनोददेखील होत नाहीत. तेवढाच विनोदाचा भाग काढून त्यावर कोण किती दिवस भंडावून सोडेल याचा भरवसा राहिलेला नाही, अशा शब्दांत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाबद्दलची भीती व्यक्‍त केली.

संत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी (ता.21) सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सोशल मीडियाबद्दल भीती व्यक्‍त केली. ते म्हणाले, की पूर्वी बिनधास्त, स्पष्टपणे बोलले जायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता दिसला नेता की मोबाईलवर फोटो, शुटिंग केली जाते. कोण कशाच्या ताटात जेवतेय, काय खातेय, कुणासोबत खातेय, हे लगेच लोकापर्यंत पोचविले जाते. त्यानंतर मग जोरदार टिप्पणी सुरू होते. 

मानसिंग पवारांना कॉंग्रेससह भाजपकडूनही ऑफर 
माजी खासदार (कै.) बाळासाहेब पवार यांच्या आयुष्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यातच श्री. विखे पाटील व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बाळासाहेब पवार यांचे पुत्र उद्योजक मानसिंग पवार यांना राजकारणात येण्याची "ऑफर' देऊन टाकली! 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेदेखील कार्यक्रमासाठी निमंत्रित होते; पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. मानसिंग पवार यांच्या आग्रहाखातर त्यांच्या जागी श्री. विखे पाटील यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच श्री. विखे यांनी मानसिंग पवार यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. दोन दिवसांपूर्वी मला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. महाविद्यालयीन दशेपासून मानसिंग आणि मी मित्र आहोत. त्यामुळे त्यांचे मला ऐकावेच लागले. आता त्यांनीदेखील माझे ऐकावे आणि राजकारणात यावे, अशी गळ त्यांनी घातली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. 

भोगले देतील योग्य सल्ला 
श्री. बागडे यांनीदेखील आपल्या भाषणात विखे यांच्या भाषणाचा धागा पकडत मानसिंग यांच्याकडे सर्वांच्या नजरा असल्याचा उल्लेख केला. राम भोगले, मानसिंग दोघेही उद्योजक आणि चांगले मित्रदेखील आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांनी कोणत्या पक्षात जावे, याचा योग्य सल्ला श्री. भोगले देतील, असा चिमटाही त्यांनी काढला. 

संवाद आणि नजरानजर होताच हशा पिकला 
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, की बाळासाहेब पवार हे आव्हान देऊन बंड करायचे. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची झोप उडायची. हा इतिहास आहे. चांगल्या अर्थाने सांगतो, असे म्हणत जर आज बाळासाहेब असते तर...? आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेला नजर दिली. हा संवाद आणि नजरानजर पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

Web Title: marathi news aurangabad news chief minister and Opposition leaders fear to social media.