औरंगाबादेत तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीवरून वाद

maratha sanghtana shivsena fight
maratha sanghtana shivsena fight

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती नुकतीच 19 फेब्रुवारीला जगभरात साजरी झाली. असे असताना शिवसेना-भाजपतर्फे चार मार्चला तिथीनुसार पुन्हा शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. हा महाराजांचा अवमान असल्याचा आक्षेप मराठा संघटनांनी घेतला. दरम्यान, बुधवारी (ता.28) सायंकाळी शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन सुरू असतानाच मराठा संघटना व शिवसैनिक यांच्यात राडा झाल्याची घटना समर्थनगर येथे घडली. 

यंदा प्रथमच तारखेनुसार ऐतिहासिक अशी शिवजयंती शहरात साजरी झाली. विशेष म्हणजे, जे नेते तारखेनुसार होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होणार नाहीत, त्यांना आगामी काळात धडा शिकवला जाईल, असा इशाराच देण्यात आला होता. त्यामुळे सर्वच पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला. असे असताना शिवसेना, भाजपतर्फे बुधवारी सायंकाळी समर्थनगर येथे चार मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जिल्हा शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 15 ते 20 समन्वयक सावरकर पुतळ्याजवळ जमले होते. शिवसेना कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी वादावादी होऊन मराठा संघटना व शिवसेना कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. हे प्रकरण चिघळण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना शांत केले.

दरम्यान, मारहाणीचा प्रकार कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना दूर केले. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे माजी आमदार श्री. जैस्वाल म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व शिवेसना कार्यकर्त्यांत वादावादी झाली; पण हा प्रकार गंभीर नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकच साजरी करा, अशी समन्वयकांची मागणी होती. त्यावर पुढील वर्षी मुख्यमंत्री व सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेऊ. महाराजांची जयंती एकच साजरी व्हावी, अशी आमची देखील भूमिका असल्याचे मी त्यांना सांगतिले. 

शिवसैनिकांकडून मारहाण 
छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला तारखेनुसार जयंती साजरी झाली. शिवसेना, भाजपतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. एकच शिवजयंती साजरी केली जावी, याबाबत चर्चा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे 10-15 समन्वयक सावरकर चौकात आले होते. याठिकाणी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्याशी चर्चा करत असतानाच मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या अंगावर धावून आले. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात रवींद्र तांगडे हे समन्वयक जखमी झाले आहेत. 
- रवींद्र काळे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com