प्रस्तावित शिवस्मारकाच्या परवानग्यांचा खुलासा करा 

प्रस्तावित शिवस्मारकाच्या परवानग्यांचा खुलासा करा 

मुंबई - अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी मिळालेल्या पर्यावरणसंबंधित परवानग्यांबाबत सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. 

समुद्रामधील प्रस्तावित स्मारकासाठी सुमारे 3600 कोटींचा अंदाजित खर्च आहे; परंतु या बांधकामामध्ये पर्यावरणाला व सागरी किनाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने दिलेली पर्यावरणासंबंधित ना हरकत परवानगी अयोग्य आहे, असा दावा करणाऱ्या दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. सामाजिक संस्थेसह काही मच्छीमार रहिवाशांनी या याचिका दाखल केल्या आहेत. न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. सरकारने याबाबत जनतेकडून सूचना आणि हरकती मागविणे बंधनकारक होते; मात्र सरकारने अशाप्रकारची कार्यवाही केलेली नाही, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला. 

केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी पर्यावरण आणि सागरी किनारा नियमनाबाबतच्या परवानग्या सरकारला दिल्या आहेत. मात्र, तसे करण्यापूर्वी संबंधित विषयावर जाहीरपणे हरकती आणि सूचना मागविणे आणि त्याचा अभ्यास करणे कायद्याने बंधनकारक आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. सरकारने तीन वर्षांपूर्वी कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार अशाप्रकारे सूचना व हरकती मागविण्याची प्रक्रिया या प्रकल्पासाठी लागू होत नाही, असा खुलासा सरकारच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने याबाबत केंद्र, राज्य सरकारसह सागरी किनारा नियमन प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याचिकेत उपस्थित आरोपांबाबत लेखी खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी महिनाभरानंतर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com