स्क्रीनच्या मोहापासून सुटका हवीय?

स्क्रीनच्या मोहापासून सुटका हवीय?

डेस्कटॉप असो वा स्मार्टफोनसारखे गॅजेट, अनेक जण दिवसभर त्यात डोके घालून बसलेले दिसतात. सतत टेक्‍स्टिंग, इंटरनेट सर्फिंग, ई-मेल पाठवणे, भरमसाट ॲप्लिकेशन वापरणे आणि गेम खेळणे, चॅनेल सर्फिंग करणे अशा गोष्टी करण्यात ते मग्न असतात. एक प्रकारे त्यांना या गॅजेटचे व्यसनच लागलेले असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान तास वाया जातात. अनेकदा नातेसंबंधांवरही त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तुम्हीही त्यापैकी एक आहात? गॅजेटच्या अतिवापराचे व्यसन अर्थात स्क्रीन ॲडिक्‍शनपासून सुटका मिळवण्यासाठी खालील उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल!

स्मार्टफोनवर नियंत्रण ठेवा  
स्मार्टफोन जेवढा उपयुक्त तेवढेच त्याचे तोटे, दुष्परिणामही आहेत. एका तासात आपण किती वेळा फोन तपासतो, यावरून सरळ-सोपे समीकरण तुमच्यासमोर येईल. महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसाचे ८-१० तास स्मार्टफोनवर व्यतित करतात, असे एका अभ्यासात उघड झाले आहे. अन्य व्यक्तीही स्मार्टफोन बराच वेळ हाताळतात. या वापरावर नियंत्रण मिळवता येते. ॲण्ड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर सेलफोनचा वापर ट्रॅक करणारी ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. तुम्ही दिवसभरात किती वेळा फोन तपासता. त्याची माहिती हे ॲप देतात. त्यावर नजर टाकून अत्यावश्‍यक नसल्यास दिवसभरात मर्यादित वेळेतच स्मार्टफोनचा वापर करण्याचे बंधन तुम्ही स्वतःवर घालू शकता. 

स्मार्ट प्लॅन करा
गॅजेटचा अतिवापर टाळण्यासाठी स्मार्ट प्लॅन करा. गॅजेटच्या वापराची एक निश्‍चित मर्यादा सेट करा. उदा. दिवसभरात ठराविक वेळेत कोणतेही गॅजेट वापरणार नाही, हे मनाशी ठरवा. त्या वेळेत इतर कामे करा. त्या काळात अन्य कामे एकाग्र चित्ताने केल्यास स्क्रीन ॲडिक्‍शन टाळण्यास मदत होईल. 

रिवॉर्ड सिस्टिम 
स्वयंशिस्तीसाठी आणि सकारात्मकतेसाठी रिवॉर्ड सिस्टिम ही एक प्रकारची उपचार पद्धत आहे. मनाशी ठरवलेल्या वेळेतच गॅजेटचा वापर करण्यात यशस्वी झाल्यास स्वतःलाच बक्षीस द्या. म्हणजेच तुम्हाला आवडणाऱ्या खाद्यपदार्थाची मजा घ्या किंवा आवडती गोष्ट करा. 

नो गॅजेट स्क्रीन हॉलिडे
गॅजेटमध्ये डोके घालून रमण्यापेक्षा मेंदूला आराम देण्यासाठी एखादा दिवस त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्या दिवसभरात एकदाही गॅजेट वापरणार नाही, हे ठरवा.

फोन सेटिंग्स बदला
सतत नोटिफिकेशन्स पाहून वाटणारा मोह टाळता येऊ शकतो. त्यासाठी एक उपाय म्हणून फोनमधील सेटिंग्स बदला. नोटिफिकेशन पिंगच्या आवाजामुळे गॅजेटकडे वारंवार लक्ष जाणे, त्यामुळे टळू शकेल. 

मानसिकता बदला
आपल्या भावना आणि वागणूक विविध प्रकारच्या गॅझेटच्या वापराशी जोडलेले आहे, हा विचार मनातून काढा. त्यामुळे गॅजेटचा अतिवापर होणार नाही. तुम्ही वापरत असलेल्या गॅजेट हे महत्त्वाचे नाही. त्याशिवाय तुम्ही जगू शकता, हे लक्षात घ्या. स्मार्ट फोन वापरतानाही एखाद्या व्यक्तीला किती तातडीने फोन किंवा संदेश पाठविणे गरजेचे आहे, याबाबतची खात्री करूनच वापर करा

पर्याय शोधा 
एखादे गॅजेट वापरताना ते वापरणे खरोखरच गरजेचे आहे का, त्याला कोणता पर्याय देऊ शकतो, याचा विचार करा. स्मार्ट फोनसारखे गॅजेटचा उद्देश लोकांशी जोडलेले राहणे हा आहे. मग प्रत्यक्ष अशा गॅजेटचा वापर करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून संबंधित व्यक्तीशी संवाद साधणे शक्‍य आहे का, हे पाहा. अनेकदा कंटाळा येतो म्हणून आपण गॅजेटचा वापर करतो. अशा वेळी आवडत्या छंदासाठी वेळ द्या.

मूड बुस्टर
व्यायाम, खेळ, चित्रकला, हस्तकलेसारख्या कलाविष्काराच्या माध्यमातून मूड बदलता येतो. या पर्यायाचाही वापर करून बघा. 

कुटुंब, मैत्रीला महत्त्व द्या
गॅजेटमध्ये गुंतून राहण्यापेक्षा एखादे पत्र लिहा. मित्राला जेवणासाठी किंवा कॉफी घेण्याच्या निमित्ताने भेटा. आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापेक्षा मित्रमंडळी-कुटुंबातील सदस्यांना दाखवा. लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टॅब, स्मार्ट फोनवर सतत गेम खेळण्याची सवय असेल, तर त्यास पर्याय म्हणून कॅरम, बुद्धिबळासारखे खेळ खेळा. सोशल मीडियावर अनेक तास गुंतून राहणाऱ्यांसाठी कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांसाठी वेळ काढण्यासारखा उपाय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com