सप्टेंबरमध्ये छाटणी करत बागा प्लास्टिकने कराव्या अच्छादितः डॉ.सावंत 

residenational photo
residenational photo

नाशिकः राज्यात काड्या वापरुन द्राक्षबागा उभारल्या जात असून शेतकऱ्यांना "मदर प्लॅंट'ची फारशी माहिती नसते. त्यामुळे झाडांविषयीची शास्त्रीय माहिती उपलब्ध होण्यासह कीडरोगावर नियंत्रणात अडचणी येतात. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे द्राक्ष उद्योगात प्रमाणित रोपवाटिका ही संकल्पना रुजवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजापूर, सांगली, मांजरी, तळेगाववणी अशा चार ठिकाणी प्रमाणित रोपवाटिकांमधून द्राक्षांच्या रोपांचे उत्पादन होणार आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी आज येथे दिली. 

महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाच्या नाशिक विभागातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात एप्रिल छाटणी चर्चासत्र झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. मोगल, विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील, मानद सचिव रवींद्र बोराडे, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले, द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे आदी उपस्थित होते. डॉ. सावंत, केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आर. डी. सोमकुवर, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. दीपेंद्र यादव यांनी द्राक्ष उत्पादकांशी संवाद साधला.
 "सकाळ'शी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, की द्राक्षाची बाग लावून उत्पादन घेईपर्यंत शेतकऱ्यांना एकराला नऊ ते लाख रुपये खर्च करावे लागतात. तसेच एक एकर द्राक्ष लागवडीसाठी किमान दहा लाख लिटर शाश्‍वत पाण्याची आवश्‍यकता भासते. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शाश्‍वत पाणी उपलब्ध करत द्राक्ष लागवडीकडे लक्ष दिले आहे. एका ठिकाणी दोन इंच पाणी विंधन विहिरीतून मिळत असताना या पाण्यातून शेततळे भरुन घेतल्याचेही मी पाहिले आहे. मुळातच, राज्यात दरवर्षी 10 ते 13 टक्के नवीन लागवड होते. त्यासाठी तीन ते साडेतीन कोटी रोपांची आवश्‍यकता भासते. आताच्या परिस्थितीत शेतकरी स्वतः रोपे तयार करतात. जगभरामध्ये मात्र प्रमाणित 
रोपवाटिकांमधील रोपांचा वापर द्राक्ष लागवडीसाठी होतो. म्हणूनच केंद्राच्या माध्यमातून टिश्‍यूपासून उत्पादित होणाऱ्या रोगमुक्त रोपांचे प्रमाणिकरण राज्य सरकारकडून घेतले जाणार आहे. 

निसर्गाच्या भरवश्‍यावर सोडू नये 
सर्वसाधारणपणे ऑक्‍टोंबरमध्ये गोड बहाराची छाटणी शेतकरी करतात. पण द्राक्षाला चांगला भाव मिळावा म्हणून सप्टेंबरमध्ये छाटणी करावयाची झाल्यास निसर्गाच्या भरवश्‍यावर बागा सोडू नयेत. शंभर टक्के प्लास्टिक आच्छादित करण्यास शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला हवे, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, की पावसाची शक्‍यता आहे. नुकसानीची अधिक शक्‍यता आहे. अशा जगभरात "टेबल ग्रेप' लावले जात नाहीत. स्पेनमध्ये पंधरा ते वीस वर्षांपूर्वी द्राक्षे नव्हती. मात्र प्लास्टिक आच्छादनामुळे मुरशिया भागात नाशिकपेक्षा अधिक द्राक्षांचे उत्पादन आता होऊ लागले आहे. बारामती भागामध्ये नायलॉन मटेरियलने आच्छादित केलेल्या बागेत रोग आला नाही आणि घड वाचल्याचे मी स्वतः पाहिले आहे. मात्र तेथेच उर्वरित भागात डावणीने घड खराब झालेत. आजवरचा अनुभव पाहता, ऑगस्टची अखेर आणि ऑक्‍टोंबरची सुरवात या कालावधीत पाऊस झाला आहे. त्याचाही विचार शेतकऱ्यांनी आच्छादनासाठी करायला हवा. 
 
डॉ. सावंत म्हणाले... 
- तमिळनाडूमध्ये दोन वर्षांमध्ये द्राक्षांची घेतली जाणारी पाच पिके फायदेशीर नव्हती. म्हणून ही पद्धत बंद करायला सांगितली आहे. तमिळनाडूमध्ये ऑगस्टपासून द्राक्षांची काढणी सुरु होईल. 
- महाराष्ट्रातून युरोपियन राष्ट्रांमध्ये 6 हजार 940 कंटेनरमधून 91 हजार 46 मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत 7 हजार 248 कंटेनरमधून 95 हजार 605 टन द्राक्षे निर्यात झाली होती. यंदाची निर्यात अद्याप सुरु असल्याने गेल्यावर्षीएवढी निर्यात अपेक्षित आहे. 
- ऑस्ट्रेलिया, न्युझिलंडमध्ये सूर्यप्रकाश कमी मिळतो. या देशांमधील द्राक्षांचे वाइनचे वाण असून यंत्राद्वारे काढणी होते. त्यामुळे या देशात द्राक्षांची लागवड उभी होते. या पद्धतीचा अवलंब आपल्याकडे करणे शक्‍य नाही. आपल्याकडे "टेबल ग्रेप'चे उत्पादन घेतो आणि सूर्यप्रकाशापासून घड वाचवण्यासाठी मांडव पद्धतीचा अवलंब केला जातो. 
- एप्रिल छाटणीच्या काळात होत असलेल्या पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा फायदा फुटवा फुटण्यासाठी होत आहे. पाऊस अथवा ढगाळ हवामान नसते, तर फुटव्यासाठी 25 दिवस लागले असते. 
- सटाणामध्ये ऑक्‍टोंबर ऐवजी जूनपासून गोड बहार धरण्यास सुरवात होते. पंढरपूरच्या पुळूज भागात गोड बहार धरण्याचे काम 15 जानेवारीपर्यंत चालते. त्यामुळे ऑक्‍टोंबरपासून ते जूनपर्यंत ग्राहकांना द्राक्षे मिळतात. 
- नवीन फूट आल्यावर पाऊस पडताच काडी, खोडावर डाग पडतात. सर्वसाधारणपणे एक ते दोन टक्के काडीवर डाग येतात. अशा काड्या काढून टाकाव्यात. छाटणीनंतरच्या येणाऱ्या फुटी काढाव्यात. 
- बुरशीनाशकाच्या नियंत्रणावर अवलंबून राहू नये. त्यातून बुरशीची प्रतिकारशक्ती वाढते. त्यावर उपाय म्हणून जैवीक नियंत्रणाचा उपयोग करणे महत्वाचे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com