आत्महत्या रोखण्यासाठी "महाऍप'ची निर्मिती 

residentional photo
residentional photo

जळगाव : सध्याच्या काळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे. या प्रकारांना विद्यार्थ्यांमध्ये होणारे मानसशास्त्रीय बदल कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. शरीरात होणारे बदल योग्यवेळी लक्षात आले व त्याबद्दल माहिती मिळाली, तर आपण विद्यार्थ्यांची त्याप्रकारे जडणघडण केली जाऊ शकते. हे बदल लक्षात येण्यासाठी शहरातील ला. ना. हायस्कूलमधील शिक्षिका पल्लवी मिलिंद जोशी यांनी "महा सायकॉलॉजी ऍप'ची निर्मिती केली आहे. या ऍपला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, पुढील महिन्यात राज्यपालांच्या हस्ते या "ऍप'चे अनावरण करण्यात येणार आहे. 

सध्या राज्यात वेगवेगळ्या भागात तणावातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. घरात न बोलणे, छोट्या-छोट्या कारणावरून वाद घालणे, संताप करणे तसेच विकृती हे प्रकार अचानक विद्यार्थ्यांमध्ये जाणवू लागले आहेत. हे मानसिक बदल मेंदूतील डोपामीन नावाचे सिक्रेशन वाढल्यामुळे होतात, यामुळे विद्यार्थी लवकर आक्रमक बनतात. या बदलांमुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासावरून आजची 95 टक्के तरुण पिढी ही तणावाखाली आहे. तरुणांमधील ही स्थिती वेळीच ओळखण्यासाठी या महाऍपची मदत होऊ शकते. यातून विद्यार्थी स्वतः व पालक, शिक्षक हे आत्महत्येचे प्रमाण कमी करू शकतात. 

अशी सुचली कल्पना 
सद्यःस्थितीतील विद्यार्थ्यांमधील बदल व त्यानुसार घडत असलेल्या घटना लक्षात घेता राज्यभरातील शिक्षकांसाठी शासनातर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय अविरत प्रशिक्षण सप्टेंबर 2017 मध्ये पुण्यात घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाला प्रत्येक तालुक्‍यातील एका शाखेच्या एका शिक्षकाची उपस्थिती होती. यात पल्लवी जोशी याही सहभागी झाल्या होत्या. त्या ठिकाणी मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करून उपाययोजना सांगण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रशिक्षणातूनच त्यांना महाऍपची संकल्पना सुचली. 

42 दिवसात ऍपची निर्मिती 
प्रशिक्षणाला जाऊन आल्यानंतर जोशी यांनी आपल्या माहितीचा उपयोग करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यात मुलांमधील मानसशास्त्रीय व मेंदूतील बदलांबाबत त्यांनी इंटरनेटवरून माहिती मिळविली. त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना बोटांचे ठसे, मनगट, पाठीचा कणा व त्यानंतर मेंदूचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे प्रेझेंटेशन तयार करून अवघ्या 42 दिवसांत त्यांनी या ऍपची निर्मिती केली. 

राज्यपालांच्या हस्ते अनावरण 
विद्यार्थ्यांशी निगडित व माहितीपूर्ण असणाऱ्या या ऍपला केंद्र शासनाने मान्यता दिली असून, येत्या 26 मे रोजी राजभवनात राज्यपालांच्या हस्ते या ऍपचे अनावरण करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र जोशी यांना प्राप्त झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com