फडणवीस सरकारचा काउंट डाउन सुरू; विरोधकांचा इशारा

Dhananjay Mundhe
Dhananjay Mundhe

मुंबई : फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारने खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनीच सरकारची ही मस्ती उतरविण्याचे ठरवले असून, खोटारड्या, फसव्या, लबाड सरकारचा काउंट डाउन सुरू झाला आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर डागले. 

उद्यापासून (ता. 26) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी रणनीती ठरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला विखे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले. 

शेतकरी धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या ही सरकार आणि दलालांनी केलेली हत्या असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करून विखे म्हणाले, की गेल्या साडेतीन वर्षांत सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. कर्जमाफीनंतरही राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने कर्जमाफीत छत्तीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा केली. आतापर्यंत त्यापैकी एकोणीस लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचे सरकार सांगत आहे. सरकार फक्त जाहिरातबाजीत पुढे आहे. कृती आणि आकडेवारीत मोठी तफावत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. फसव्या जाहिराती करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. 

नुकतेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारने दोनशे कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठविणार असल्याचे सांगितले आहे. गारपिटीमुळे 7 लाख 83 हजार एकर क्षेत्राचे नुकसान झाले. दोनशे कोटीतून एकरी दोन हजार रुपयांपर्यंतची मदत मिळेल. शेतकऱ्यांना मदत देता की भीक देता, असा संतापजनक सवाल विखे यांनी या वेळी केला. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रमधून राज्यात किती गुंतवणूक झाली याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी केली. कमला मिल दुर्घटना, कोरेगाव भीमाची दंगल यावरूनही त्यांनी भाजप-शिवसेनेला लक्ष्य केले. 

या वेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य दिवाळखोरीत गेल्याचे सांगून ते म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत एक लाख 70 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करून सरकारने देशात विक्रम केला आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणावरही सरकार स्पष्ट बोलत नाही. मंत्र्यांचा भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावळ स्वतःच्या खात्याचा उपयोग स्वतःसाठीच करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. या सर्व मुद्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com