साखर पुन्हा दीडशेनी घसरली

साखर पुन्हा दीडशेनी घसरली

भवानीनगर - केंद्र सरकारने साखर दर नियंत्रणाची केलेली उपाययोजना तात्पुरतीच ठरली असून, पंधरा दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ३१६० रुपयांवर वाढलेले साखरेचे दर कालपासून पुन्हा ३ हजारांवर घसरले आहेत. अवघ्या दहाच दिवसांत साखरेचे भाव पुन्हा १५० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे नुकतेच बॅंकेने वाढविलेले मूल्यांकनही घटण्याची चिन्हे असल्याने साखर कारखाने हवालदिल झाले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने साखर उद्योगाची अडचण लक्षात घेत साखर कारखान्यांनी किती साखर विकावी याचे निर्देश दिले होते. त्यानुसार फेब्रुवारीत कारखान्यांनी त्यांच्या उत्पादनापैकी ८६ टक्के साखर शिल्लक ठेवावी असे आदेश दिले. त्यामुळे साखरेचे दर २८६० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१६० रुपयांपर्यंत पोचले. त्यानंतर साखरेचे दर वाढताच राज्य सहकारी बॅंकेनेही साखरेचे मूल्यांकन २९७० रुपयांवरून १३० रुपये वाढवत ३१०० रुपये प्रतिक्विंटल केले. यामुळे कारखान्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, हे समाधान अवघ्या काही दिवसच टिकले.

छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी ५०-१०० रुपयांनी साखरेचे दर वाढविणे ही काही उपाययोजना नाही, साखरेचे दर ३५००-३६०० रुपयांपर्यंत स्थिर राहिले पाहिजेत, तरच साखर उद्योगापुढील सध्याची चिंता कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कारखानेही हतबल
दोन दिवसांपूर्वी साखरेचे दर अचानक घसरल्याने कारखान्यांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच अगदी ३ हजार रुपयांवर साखर विक्रीसाठी ठेवूनही त्यालाही उठाव मिळत नसल्याने कारखाने हतबल झाले आहेत. अजूनही साखरेचे दर कोसळण्याचे संकट समोर आहे. त्यामुळे केंद्र सरकारची उपाययोजना म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी होती असेच दिसून आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com