मुंबईवर घोंघावले भगवे वादळ; लाखो मराठ्यांचा लोटला महासागर

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

अफाट जनसागराच्या साक्षीने मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत अत्यंत शिस्तबद्धरित्या आज (बुधवार) सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले असूनही रुग्णवाहिकेला तात्काळ वाट करुन देण्यात आली. तसेच अत्यंत शिस्तबद्धरित्या मोर्चा आझाद मैदानावर पोहचला. पावसानेही या मोर्चाला सलामी दिली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आझाद मैदानात प्रवेश करत असताना त्यांनी हुसकावून लावण्यात आले आणि धक्काबुक्की करण्यात आली. राजकीय नेत्यांना याठिकाणी सामावून घेण्यात आले नाही.

मुंबई : पावसाचा प्रलय पाहिलेल्या मुंबईने आज (बुधवार) मराठा क्रांती मूक मोर्चाच्या रुपाने भगवे वादळ अनुभवले. भायखळातील जिजामाता उद्यानापासून निघालेला मोर्चा आझाद मैदानावर पोचला तरीही मोर्चेकरी झेंडे हाती घेऊन मोर्चात सहभागी होत होते. आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले.

अफाट जनसागराच्या साक्षीने मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत अत्यंत शिस्तबद्धरित्या आज (बुधवार) सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले असूनही रुग्णवाहिकेला तात्काळ वाट करुन देण्यात आली. तसेच अत्यंत शिस्तबद्धरित्या मोर्चा आझाद मैदानावर पोहचला. पावसानेही या मोर्चाला सलामी दिली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आझाद मैदानात प्रवेश करत असताना त्यांनी हुसकावून लावण्यात आले आणि धक्काबुक्की करण्यात आली. राजकीय नेत्यांना याठिकाणी सामावून घेण्यात आले नाही.

भायखळ्यातील राजमाता जिजामाता उद्यानापासून निघालेला हा मोर्चाचे वर्णन केवळ अभूतपूर्व या शब्दात करता येईल. भायखळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचे शेवटचे टोक दिसत नाही, इतका जनसागर मोर्चाला लोटला होता. मोर्चाच्या मार्गावरील मुंबई स्तब्ध होऊन हा विराट महामोर्चा अनुभवत आहे. कित्येक किलोमीटरच्या रस्त्यावर केवळ भगव्याचे अस्तित्व दिसते होते. अनेक मार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.  

मोर्चाच्या अग्रभागी तरूणी आहेत. या तरूणी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन सरकारला सादर केले. या आधीच्या सर्वच 57 मोर्चांमध्ये याच पद्धतीने मोर्चेकऱयांनी निवेदन सादर केले होते. मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय मुंबईतील डबेवाल्यांनी घेतला आहे. आज मुंबईत डबेवाले डबे पोहोचविण्याचे काम करणार नाहीत, असे डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. सर्व मराठी वाहिन्या आणि देशभरातील प्रमुख टीव्ही वाहिन्यांनी या मोर्चाचे लाईव्ह कव्हरेज प्रसारित केले आहे.

राजकीय नेत्यांचा सहभाग 
मोर्चाच्या आचारसंहितेप्रमाणे राजकीय नेते मोर्चात सहभागी झाले. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करून सर्वपक्षीय आमदार मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला उद्देशून पाच युवतींची भाषणे आझाद मैदानावर झाली. त्यानंतर या मुली शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विधानभवनात गेल्या.