‘मराठी गौरवा’वरून सरकारची कोंडी

‘मराठी गौरवा’वरून सरकारची कोंडी

मुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली. ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मराठी भाषा गीत अपूर्णच गायले. त्यामुळे सरकारने राज्याची माफी मागावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यांची ही मागणी विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी बाकांवरील सर्वच सदस्यांनी उचलून धरली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

‘मराठी भाषा दिना’च्या कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले मराठी गौरव गीत गायले. या कार्यक्रमादरम्यान मध्येच काही काळ ध्वनिक्षेपकही बंद पडला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठी गौरव गीताचे अखेरचे कडवे गायले न गेल्याबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आणि मराठीचा अपमान केल्याबद्दल सरकारने माफी मागावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांनीही हाच मुद्दा लावून धरत सरकारच्या माफीची मागणी केली. त्यावर ‘ही कविता कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात लिहिली गेली, याचा अगोदर तपास करावा म्हणजे मराठी भाषेवर कोण अन्याय करत होते, हे लक्षात येईल’, असे उत्तर फडणवीस यांनी विरोधकांना दिले. मात्र, त्यातील कडवे काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्‍न जयंत पाटील यांनी केला. त्यावर फडणवीस आणि पाटील यांच्यात वाद झाला. यादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी बाकांवरील सदस्य आक्रमक झाल्याने काही काळ सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे अध्यक्षांनी १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. 

तहकुबीनंतर कामकाज सुरू होताच, अजित पवारांनी मराठी भाषेचा मुद्दा लावून धरत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी मराठी विषय अनिवार्य करावा, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सध्या राज्यात आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असून, दहावी किंवा बारावीपर्यंत ती अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी हा विषय शालेय अभ्यासक्रम ठरवणाऱ्या अभ्यास मंडळाकडे सोपवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. या उत्तरावर समाधान न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय महिनाभरात निर्णय घेणार का, अशी विचारणा करत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे काय झाले, अशी चौकशी केली. त्यावर अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी पुन्हा गोंधळाला सुरवात केली. अखेर विरोधकांच्या आक्रमकतेमुळे अध्यक्षांनी सभागृहाची बैठक दुसऱ्यांदा तहकूब केली.

कडवे वगळले नाही - विनोद तावडे
कविवर्य सुरेश भट यांच्या ‘रूपगंधा’ काव्यसंग्रहाच्या शेवटच्या आवृत्तीत मराठी भाषेच्या अभिमान गीताची सहा कडवीच प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळ आवारात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातील समूह गायनात या गीतातील सातवे कडवे वगळलेले नाही, असा खुलासा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केला.

ते म्हणाले, की ही मूळ कविता ‘रूपगंधा’ या काव्यसंग्रहात आहे. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यात भट यांची सहा कडव्यांची कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘रूपगंधा’च्या शेवटच्या आवृत्तीतही सहा कडव्यांचीच कविता प्रसिद्ध झाली आहे.

‘शिवसेनेला सापत्न वागणूक’
मराठी भाषादिनी मंगळवारी मराठी अभिमान गीताचे गायन विधिमंडळ परिसरात सुरू असतानाच अचानक ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सरकारला नाचक्‍कीचा सामना करावा लागला. दुसरीकडे या कार्यक्रमात शिवसेनेला डावलले, अशी तक्रार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत मराठी अभिमान गीत गायन करण्यात आले. शिवसेना संसदीय पक्षाचे प्रमुख आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते, असा आरोप होत आहे. सरकारी मुख्य कार्यक्रम आटोपल्यावर ज्येष्ठ मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून मराठी दिन साजरा केला. शिवसेनेलाही या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया रावते यांनी व्यक्‍त केली आहे.

भाषादिनी अभिनंदनाचा ठराव
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी अभिनंदनाचा ठराव मांडला. मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी, यासाठी सरकारने मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करत विधानसभेत त्यांनी हा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. विधिमंडळाचे अधिवेशन व मराठी भाषा गौरव दिन हा एक योगायोग आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि या भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे बागडे या वेळी म्हणाले.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधानसभा तालिका अध्यक्षांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यात योगेश सागर, सुधाकर देशमुख, सुभाष साबणे, शंभूराज देसाई, श्‍यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com