गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता बिल्डरांचे दलाल : संजय निरुपम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता बिल्डरांचे दलाल आहेत. त्यांनी त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुर्ची रिकामी करावी, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता बिल्डरांचे दलाल आहेत. त्यांनी त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुर्ची रिकामी करावी, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

महेता यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानावर मुंबई काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, महेता यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांचा राजीनामा मागण्याची गरज का निर्माण झाली? संपूर्ण महाराष्ट्र आज महेता यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे त्यांचा राजीनामा मागत आहे; पण ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. ज्या जनतेने निवडून दिल्यावर आमदार झाले, नंतर गृहनिर्माण मंत्री होऊ शकले, त्या जनतेची त्यांनी घोर फसवणूक केली आहे. एसआरएच्या माध्यमातून लोकांच्या घरांचा विकास करणे हे त्यांचे काम असताना ते गरिबांना फसवून घोटाळ्यांवर घोटाळे करत आहेत. आजचा मोर्चा भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करण्यासाठी काढला आहे. महेता यांचा राजीनामा आणला आहे. त्यांना फक्त त्यावर स्वाक्षरी करायची आहे. 

महेता यांनी एका विकसकाचा फायदा करण्यासाठी म्हाडाने बिल्डरकडून काढून घेतलेला भूखंड परत त्याच बिल्डरला परत देऊन बिल्डरला कोट्यवधींचा फायदा झाला आहे. त्यांचा किती फायदा झाला, ही गोष्ट गुलदस्त्यातच आहे. विधानसभेत जेव्हा हा विषय निघाला, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून याबाबत परवानगी घेतल्याचे सांगितले; पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. अजूनही त्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. अशा या भ्रष्टाचारी आणि बिल्डरांचे दलाल असलेल्या महेता यांना गृहनिर्माण मंत्रिपदावर बसण्याचा काहीच अधिकार नाही, असेही निरुपम यांनी सांगितले. 

मोदींचे एक वाक्‍य आठवते की, 'खातो नथी और खाओ देतो नथी.' पण, त्यांचे मंत्री घोटाळे करत आहेत आणि खाऊन पचवत आहेत. गरिबांना दात दाखवत आहेत. या क्षणाला फडणवीस सरकारच्या सर्व मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असे असतानाही भाजप सरकार त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही. म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे. 

मोर्चामध्ये संजय निरुपम यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील, संदेश कोंडविलकर आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.