सत्ताधारी आघाडीबरोबर आणखी 25 आमदार?

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला तब्बल 10 वर्षांनी शिवसेनेने पाठिंबा दिलेला असतानाच आणखी 25 मते या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची संधी मिळाली आहे.

सर्व पक्षांच्या आमदारांवर मोहिनी घालून त्यांना विकासकामांचे गाजर दाखवण्याचे फडणवीस यांचे कसब या निमित्ताने फलदायी ठरणार आहे, अशी जोरदार चर्चा सत्ताधारी गटात आहे. फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही या मोहिमेला हातभार लावणे सुरू ठेवले असून दोन दिवसांत विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांना पाठवले जाणारे निरोप वाढणार असल्याचे मानले जाते.

अपक्ष आमदार रवी राणा यांनीही समर्थन वाढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून अनेक आमदारांची नावे जोडली जात असतानाच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोणताही पक्षादेश (व्हिप) नसल्याने शक्तिप्रदर्शन करणे मुख्यमंत्र्यांच्या पाठीराख्यांना सोपे जाईल.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही आमदार त्यांच्या निष्ठा दाखवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना मतदान करतील. भाजपचे आमदार तीन दिवस मुंबईत मुक्‍कामी आहेत. त्यांनीही स्वत:च्या शक्‍तीनुसार संपर्क वाढवणे सुरू केले आहे; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची नावे अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर काहीसा रोष सहन करणाऱ्या फडणवीस यांना या निवडणुकीनिमित्त पुन्हा 'कमबॅक' करण्याची संधी मिळणार आहे, असे मानले जाते. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपापल्या सदस्यांशी संपर्क साधला आहे. पक्षादेशाचे या निवडणुकीत प्रयोजन नसते, त्यामुळे निरोप पाठवून आमदारांना बरोबर राहा, अयोग्य पाऊल उचलू नका, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांच्या प्रतोदांनी आमदारांशी संपर्क साधणे सुरू ठेवले आहे. अर्थात राष्ट्रपतिपदासाठी वेगळे मतदान असले तरी आम्ही कॉंग्रेससोबत आहोत, असे या आमदारांचे म्हणणे आहे. 

मतदानासाठी खास पेन 
सोमवारी (ता.17) सकाळी मतदानास सुरुवात होईल. विधिमंडळ कक्षात आमदारांना त्यासाठी खास पेन देण्यात येईल. त्या विशिष्ट शाईनेच स्वाक्षरी करायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com