सायबर गुन्ह्यात ज्येष्ठ नागरिक टार्गेट! 

सायबर गुन्ह्यात ज्येष्ठ नागरिक टार्गेट! 

मुंबई - डेबिट कार्ड आणि विमा कंपन्यांच्या नावाखाली भामट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सायबर गुन्ह्यात ज्येष्ठांना टार्गेट करणे सोपे जात असल्याने असे गुन्हे वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्याच्या 20 टक्के घटना राज्यात घडल्याची नोंद आहे. 

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार रोखण्याकरता पोलिस जनजागृती करत असतात. तरीही बॅंका, विमा कंपन्या आदींच्या नावाखाली वृद्धांची फसवणूक केली जाते. बोरिवलीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला काही दिवसांपूर्वी भामट्यांनी दोन लाखांचा गंडा घातला. त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बॅंक किंवा विमा कंपन्यांचा प्रतिनिधी बोलतोय, असे सांगून त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढली जाते. बॅंकेचा प्रतिनिधी बोलतोय म्हटल्यावर ज्येष्ठ नागरिक विश्‍वास ठेवतात आणि त्यांची फसवणूक होते. सध्याचा फसवणुकीचा नवा ट्रेंड असल्याचे सायबर तज्ज्ञ सांगतात. सध्या वृद्धांना विमा पॉलिसीच्या नावाखाली गंडा घातला जात आहे. विम्यात गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील, असे प्रलोभन त्यांना दाखवले जाते. प्रोसेसिंग फी आणि अन्य प्रक्रियेकरता पैसे लागतील, असे सांगून फसवणूक केली जाते. कित्येकदा वृद्धांबरोबर फेसबुकवर मैत्री करून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. मैत्रीतून त्यांच्या बॅंक खात्याची माहिती गोळा करून अज्ञात चोरटे त्यावर डल्ला मारतात. ज्येष्ठांच्या फसवणुकीच्या 20 टक्के तक्रारींची राज्यभरात नोंद आहे. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याचे महाराष्ट्र सायबरचे पोलिस अधीक्षक डॉ. बाळसिंग राजपूत यांनी सांगितले. 

ज्येष्ठांनी काय काळजी घ्यावी? 
- अनोळखी व्यक्ती किंवा ई-मेलवर क्‍लीक करू नका 
- इलेक्‍ट्रॉनिक सुविधांचा पासवर्ड वेळोवेळी बदला 
- स्मार्टफोनमध्ये बॅंकेसंबंधित महत्त्वाची माहिती सेव्ह करू नका 
- बॅंक खाते, पॅन कार्ड आणि आधार कार्डबाबतच्या ओटीपीची माहिती कोणालाही देऊ नका 
- लॉटरी, बक्षीस आणि एसएमएस आल्यास भूलथापांना बळी पडू नका 

सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक जुहूत 
शहरात एकट्याने राहणाऱ्या वृद्धांवर झालेले हल्ले पाहता पोलिसांनी "वन सोसायटी वन कॉप्स' उपक्रम सुरू केला. पोलिसांनी मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती नोंदवून घेतली. पोलिसांच्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण 17 हजार 732 ज्येष्ठ नागरिक राहतात. सर्वाधिक संख्या जुहूत 1096 अशी आहे. त्यापाठोपाठ डोंगरी ः 808, कुलाबा ः 556, ओशिवरा ः 685, खार ः 530 आणि दहिसर ः 729 असा क्रम लागतो. शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरात ज्येष्ठांची संख्या 10 पेक्षाही कमी आहे. मुंबई पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांकरता "1090' क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. त्या हेल्पलाईनवर महिन्याला 50-60 कॉल येत असतात. 

पालघर पोलिसांचा विशेष उपक्रम 
एकाकी वृद्धांना भक्कम आधार देण्याचे काम पालघर पोलिस करत आहेत. पालघर जिल्ह्यात एक हजार 790 ज्येष्ठ नागरिक आहेत. एकाकी राहणाऱ्या 168 जोडप्यांना अनेक अडचणी येतात. त्यांच्यासाठी पालघर पोलिसांनी खास हेल्पलाईन तयार केली आहे. "8669609544' क्रमांकाची हेल्पलाईन 24 तास सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईनवर व्हॉट्‌सऍपची सुविधा आहे. आतापर्यंत हेल्पलाईनवर 400 कॉल आल्याचे पालघरचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com