भाजप म्हणजे सत्तेवर आलेली निर्जीव 'रस्सी': शिवसेना

Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP

मुंबई : इटलीतील न्यायालयाने ‘ऑगस्ता’ प्रकरणात भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा दिला तसा ‘टु जी’ घोटाळा हा कपोलकल्पित असल्याचा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे किती गंभीरपणे पाहायचे असा प्रश्न यापुढे देशवासीयांना पडला असेल. भ्रष्टाचार म्हणजे काय? हे आता नव्याने ठरवावे लागेल. विरोधी पक्षांत असताना ‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’ म्हणून ज्या सापास झोडपतो तो साप नसतो. सत्तेवर येताच ती एक निर्जीव ‘रस्सी’ निघते. सध्या तेच चाललेले दिसते, असा टोला शिवसेनेने भाजपला लगाविला आहे.

शिवसेनेने आज (बुधवार) आपल्या 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेकडून सतत भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. आता भाजपने विरोधी पक्षात असताना केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्द्यांवर क्लिन चीट मिळत असल्याचे दिसत आहे.

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे, की भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? हे आता पुन्हा एकदा नव्याने तपासावे लागेल. एखाद्या प्रकरणात ‘भ्रष्टाचार झाला हो ss’ म्हणून बोंबलायचे. रस्त्यांपासून संसदेपर्यंत गोंधळ घालायचा. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या टेबलावर असलेल्या व नसलेल्या पुराव्यांच्या फायली आपटायच्या, चौकशी समित्या नेमून काहीजणांच्या गाडी-घोड्यांची सोय करायची, राजकीय विरोधकांचे ‘काटे’ काढण्यासाठी चमचे मंडळींना सुपाऱ्या द्यायच्या, पण शेवटी या सगळ्याचे फलित काय? तर ज्यांच्यावर बेधुंद आरोप झाले तेच लोक न्यायालयात पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. हे गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा घडले आहे. टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा व खासदार कनिमोळी यांच्यासह अनेकांना होलसेलात निर्दोष ठरविण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला व आता पाठोपाठ ऑगस्ता वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात कोणतीही लाचखोरी झाली नसल्याचा निर्णय इटलीतील एका न्यायालयाने दिला आहे.

‘टु जी’ घोटाळय़ाचा आरोप भाजपनेच केला होता व ऑगस्ता वेस्टलॅण्ड प्रकरणांतही काळेबेरे असल्याचा संशय आधी भाजपनेच व्यक्त केला. भाजपची सत्ता दिल्लीत असतानाच त्या दोन्ही प्रकरणांची हवा न्यायालयाने काढली. जसे इटलीतील न्यायालयाने ‘ऑगस्ता’ प्रकरणात भ्रष्टाचार झालाच नसल्याचा निर्वाळा दिला तसा ‘टु जी’ घोटाळा हा बनावट व कपोलकल्पित असल्याचा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला. बोफोर्स प्रकरणातही वेगळे घडले नव्हते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे किती गंभीरपणे पाहायचे असा प्रश्न यापुढे देशवासीयांना पडला असेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com