अवयवदानासाठी मुंबई ते गोवा पायी वारी 

walking
walking

मुंबई - आयुष्यभर साथ देत आलेली अर्धांगिनी रुग्णालयात उपचार घेत असतानाही मुलांवर तिची जबाबदारी सोपवून नाशिकचा 68 वर्षांचा अवलिया सुनील देशपांडे अवयवदानासाठी पायी वारी करणार आहे. अवयवदानाचे महत्त्व पुरेपूर पटलेले देशपांडे सलग दुसऱ्या वर्षी त्याबाबत जागर करीत असून, यंदा कोकणमार्गे मुंबई-गोवा अशी तब्बल 826 किलोमीटरची पायी वारी 52 दिवसांत करण्याचा त्यांचा निर्धार आहे. 

अवयवदानाबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. गाव-खेड्यांत त्याची जास्त आवश्‍यकता असल्याचे लक्षात आल्याने नाशिकचे सुनील देशपांडे अवयवदानासाठी पायी वारी करतात. बाबा आमटे यांनी "भारत जोडो'साठी आणि विनोबा भावे यांनी भूदान चळवळीसाठी केलेल्या पदयात्रेपासून प्रेरणा घेऊन अवयवदानासाठी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात. देशपांडे यांच्या 63 वर्षांच्या पत्नी रंजना रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर 13 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया झाली. तरीही मुलांवर तिची जबाबदारी सोपवून अवयवदानाच्या वारीसाठी ते मुंबईहून निघणार आहेत. गेल्या वर्षीच्या वारीत पत्नीने माझी काळजी घेतली होती. गाडीही चालवली होती, असे देशपांडे सांगतात. 

अवयवदानासाठी पायी वारी करण्याचे देशपांडे यांचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी नाशिक-नागपूर-आनंदवन अशी एक हजार 340 किलोमीटरची 45 गावांतून जाणारी वारी 52 दिवसांत पूर्ण करण्यात त्यांना यश आले आहे. अवयवदानासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यंदा कोकणात वारी करण्याचे सुचवले होते. कोकणात अवयवदानाबाबत कमी जागरूकता असल्याने यंदा तिथून वारी न्यावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे देशपांडे सांगतात. 

परळमधील के. ई. एम. रुग्णालय परिसरातून 23 फेब्रुवारीला सुनील देशपांडे यांची अवयवदानाची वारी सुरू होणार आहे. 15 एप्रिलला पणजीमध्ये त्याची सांगता होईल. 826 कि.मी.च्या वारीत साधारण दहा जण त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. वाटेत प्रत्येक मुक्कामी अवयवदान व देहदानाविषयी प्रबोधनपर व्याख्यानेही देण्यात येणार आहेत. 

वारीत सहभागी होण्याचे आवाहन 
सुनील देशपांडे यांच्या पायी वारीत इच्छुकांनाही सहभागी होता येणार आहे. संपूर्ण वारी पूर्ण करणे शक्‍य नसलेल्यांना एखाद्या गावातून सहभागी होता येईल. दररोज 15 किलोमीटर चालण्याचा निर्धार आहे. 
संपर्क - 9657709640 किंवा 02532315506.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com