आता बस्सं झालं ! संधी मिळताच सरकारला खड्यासारखं बाजूला करा:शरद पवार  

live photo
live photo

नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच सरकारला खड्यासारखं बाजूला करत परिवर्तन करावे लागेल असे आवाहन केले. 

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर राष्ट्रवादीच्या सरकारविरोधातील उत्तर महाराष्ट्रामधील हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोप सभेत श्री. पवार बोलत होते. माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजीमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबातील कर्तृत्वानांवर आत्महत्येची वेळ आली आहे याकडे लक्ष वेधत श्री. पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देशात वर्षाला 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात अशी माहिती दिल्याचे उपस्थितांना सांगितले. तसेच देशातील आत्महत्या दर वाढत असून हे प्रमाण 42 टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

बेरोजगारीचा भस्मासूर वाढतो 
नोकऱ्यांमधील जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाहीत. नवीन कारखानदारी येत नाही. त्यामुळे हाताला काम मिळत नसून बेरोजगारीचा भस्मासूर वाढत चालला आहे. त्यामुळे आता शेतीत एकाला ठेऊन दुसऱ्याला धंद्यात ठेवावे लागेल, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, भूईमुग, तीळ, गव्हाचे उत्पादन घटले. दुसरीकडे शेतमालाला किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक करण्याची ताकद राहिली नाही. मात्र दिल्लीत कर्जमाफीची तयारी नसल्याने शंभर टक्के कर्जमाफी करण्याची इच्छा 
मुख्यमंत्र्यांची नाही. कर्जमाफी पुरेशी नसताना डोक्‍यावरील ओझ्याची नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे. नोटबंदीनंतर सहकारी बॅंकांमधील नोटा बदलून देण्याऐवजी तोटा म्हणून सहन करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. 


गुळवे अन्‌ मंडाले राष्ट्रवादीत 
शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ऍड्‌. रवींद्र पगार यांनी प्रास्ताविक केले. आमदार जयवंत जाधव यांचेही भाषण झाले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप गुळवे, कॉंग्रेसचे लक्ष्मण मंडाले, दत्तात्रय माळोदे, संगीता राऊत, निलेश जाधव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील आई-वडिलांना आत्महत्या केलेल्या आकांक्षा दिनेश पवार या चिमुकलीने "शिवरायाचं राज्य आहे काय?', असा प्रश्‍न उपस्थित करत तिने शेतकऱ्यांना वाचवण्याची आर्तहाक दिली. आमदार हेमंत टकले यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी सभा नाशिककरांपर्यंत पोचू नये म्हणून सरकारने विजपुरवठा खंडीत केल्याची टीका केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
 

भुजबळांना डांबून ठेवल्याचा खेद 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवल्याचा खेद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोंदवला. श्री. मलिक यांनी सरकार जास्त काळ चालणार नाही या भीतीपोटी सरकारने श्री. भुजबळ यांना तुरुंगात ठेवल्याचे सांगितले. त्यांनी श्री. भुजबळांना न्यायालयात न्याय मिळेल असा आशावाद मांडला. तुरुंगातून भुजबळ योद्धे तुरुंगातून लढताहेत अन्‌ महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी सरकारला गुजरात देण्यास तयार असल्याची टीका श्री. आव्हाड यांनी केली. तसेच श्री. भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी पक्षाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र त्यांनी वाचून दाखवले. खासदार सुळे यांनी भुजबळांच्या आठवणींना उजाळा दिला. 

किसान सभेच्या आंदोलनाला पाठिंबा 
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विधानभवनाला सोमवारी (ता. 12) घेराव घालण्यासाठी नाशिकमधून रवाना झालेल्या किसान सभेच्या "लॉंग मार्च'ला राष्ट्रवादीतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहतील. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने "लॉंग मार्च'मध्ये मला सहभागी होत येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री. तटकरे यांनीही कम्युनिस्टांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील अशी घोषणा केली. 

कोण काय म्हणाले 
- चित्रा वाघ ः "कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे विचारण्याची वेळ आली आहे. गाईबरोबर राज्यातील ताईंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
- जितेंद्र आव्हाड ः नाशिकमधील परिवर्तनवादी, विवेकवादी चळवळीतील कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत आहे. परिवर्तनवादी चळवळ दडपण्याचा पोलिसांच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे. मात्र चळवळ कायम राहावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांसोबत राहू. शिवाय लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील. पक्षाध्यक्षांनी लिंगायत समाजाच्या मागणीसंबंधी राष्ट्रपतींची भेट घेण्याचे ठरवले आहे. 
- सुप्रिया सुळे ः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा अशी मागणी संसदेत केली. राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. सरकारने आता मराठी शाळा बंद करण्याचे धोरण स्विकारले असले, तरीही अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेतर्फे शाळा बंद न करण्याचे ठरवले आहे. विधानसभेत पक्षातर्फे एका विद्यार्थ्यासाठी शाळा चालवली पाहिजे अशी मागणी लावून धरण्यात येईल. स्वर्गीय नेते आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले. पण राज्यातील मंत्री दारुला महिलांचे नाव द्या असे सांगतात. त्याविरोधात प्रेरणा बलकवडेंनी आंदोलन केल्यावर माफी मागितली जाते
- धनंजय मुंडे ः रोजगाराचा अर्थ पंतप्रधान भजी तळणे असे लावत असतील तर हा तरुणाईचा अपमान आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीची लढाई आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सरकारने अपमान केला आहे. जलयुक्त, सिंचन योजना झाल्या असा दावा केला जात असेल, तर रब्बीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा क्षेत्र कसे कमी झाले? हा खरा प्रश्‍न आहे. सरकार आकड्यांची "जगलरी' करत असल्याचे पाहून पूर्वी मटका खेळत होते का? अशी शंका वाटते. 
- सुनील तटकरे ः सरसकट कर्जमाफी, गुजरातला पाणी पळवणे, रोजगारातील घट याविरोधात राष्ट्रवादीचा संघर्ष सुरु राहील. 
- प्रफुल्ल पटेल ः आताच्या कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना "राधे-राधे' केले. तसेच सरकारने शिष्यवृत्ती, रोजगाचा प्रश्‍न जटील केले आहेत. 
.... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com