शिरूरला कांदा बाजार

शिरूरला कांदा बाजार

शिरूर - शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या नवीन कांदा बाजारात आज पहिल्याच दिवशी सुमारे एक हजार टन कांद्याची आवक झाली. बाजार समितीने निमंत्रित केलेल्या व्यापाऱ्यांनी लिलावाने कांदा खरेदी केली. सर्वसाधारणपणे १६०० ते २२०० रुपये क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळाला.  

माजी आमदार ॲड. अशोक पवार व पोपटराव गावडे यांच्या हस्ते काटा पूजनाने या कांदा बाजाराचा प्रारंभ झाला. कृषिमित्र शिवाजीराव झंजाड, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, बाबूशेठ बोरा, रवीबापू काळे, अमोल चव्हाण, कुंडलिक शितोळे आदी उपस्थित होते. कांदा उत्पादक शेतकरी व शिरूरबरोबरच पारनेर, श्रीगोंदा, पुणे, नगर येथून कांदा खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचा बाजार समितीने सन्मान केला.         

शिरूर बाजार समितीने अल्पावधीत चौफेर प्रगती सुरू केली असून, दीड वर्षात कर्जमुक्तीचा संकल्प असल्याचे ॲड. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘बाजार समितीवर पावणेदोन कोटी रुपये कर्ज आहे. १४ लाख रुपये तोटा होता, कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. नुकसान भरून काढताना नऊ महिन्यांत वीस लाख रुपये नफा मिळवला आहे. सभापती शशिकांत दसगुडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कारभार चालला आहे.’’  

शेतकरीहित डोळ्यांसमोर ठेवूनच बाजार समितीचा कारभार चालू आहे. शिरूर बाजार समितीला राज्यातील आदर्श बाजार समितीचा लौकिक मिळवून देण्याचा संचालक मंडळाचा संकल्प असल्याचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले. बाजार समितीचे संचालक संतोष मोरे यांनी स्वागत केले. बाबूराव पाचंगे, रामदास थोरात, निवृत्ती नाणेकर, हेमंत पारख व सतीश पोखर्णा यांचीही भाषणे झाली.  संचालक विजेंद्र गद्रे यांनी सूत्रसंचालन केले. बाजार समितीचे उपसभापती विश्‍वास ढमढेरे यांनी आभार मानले.

पहाटेपासून वाहनांच्या रांगा  
शिरूरसह, खेड, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्‍यांतून या बाजारात कांद्याची मोठी आवक झाली. आज भल्या पहाटेपासून कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांच्या नवीन मार्केट यार्डात रांगा लागल्या होत्या. दूरचे शेतकरी रात्रीच कांदा घेऊन आले होते. कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांनी आणि परिसरात रचलेल्या कांद्याच्या गोण्यांनी बाजार समितीचा परिसर फुलून गेला होता. कांदा व्यवहारासाठी शेड, ओटे, वजनकाटे अशी चोख व्यवस्था बाजार समितीने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com