residenational photo
residenational photo

स्मृती बिश्‍वासांच्या कार्यकर्तृत्वाने "चंदेरी दुनिये'स चार चॉंद...! 

नाशिक : वैभव,सुखसमृध्दी पायाशी लोळण घालत असतांना त्यावर मात करत 1930 ते 60 च्या कालावधीत एक युवती पुढे येतं, चंदेरी दुनियेत पाऊल ठेवत आपलं "करिअर' घडविण्याचं स्वप्न पाहते आणि हा हा म्हणता एक दोन नव्हे तर ऐंशीहून अधिक हिंदी-बंगाली चित्रपटांतून भूमिका करत कर्तृत्वाचं ठसा उमटवते आणि संघर्षातून आपली वाटचाल सुरुच ठेवते... प्रत्येकालाच प्रेरणा देणारा असा हा प्रवास आहे. नाशिकमध्ये पाच वर्षापासून वास्तव्यास असलेल्या आणि नव्वदी गाठलेल्या जेष्ठ अभिनेत्री स्मृती बिश्‍वास यांचा. "निफ'तर्फे त्यांना "निफ जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या(ता.22) पासून सुरु होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल. यावर "सकाळ'शी आपल्या भावना व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेच्या नगरीत सुखशांती मिळत आहे. 
सध्या नाशिक रोडच्या जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव परिसरातील रुबी अपार्टमेंटमध्ये मुलगा राजीव यांच्यासमवेत पाचशे चौरसफुटांच्या सदनिकेत त्या राहत आहे. मुंबईत भाईदास हॉलमध्ये मनोज कुमार, धर्मेंद्र, रेखा, शबाना, प्रियंका चोपडा, दारासिंह अशा दिग्गजांच्या उपस्थितीत 2011 मध्ये स्मृती बिश्‍वास यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले 
 

सारांच प्रवास थक्क करणारा.... 
कोलकता, लाहोर, मुंबई असा प्रदीर्घ काळ रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या स्मृती बिश्‍वास यांचे आई-डील शिक्षक होते. आई-वडील ढाक्‍याजवळच्या गावातून कोलकत्यात पोचले. स्मृती लहान असतांना थिएटरमध्ये नृत्य करताना "मधुमती' चित्रपटाचे दिग्दर्शक बिमल रॉय यांनी पाहिले. बालकलाकार म्हणून चार चित्रपटांत भूमिका साकारल्यावर 1942 मध्ये त्या लाहोरला गेल्या. 1942 मध्ये त्यांची नायिका म्हणून करिअरची सुरवात झाली. त्यांची भूमिका असलेल्या "रागिनी' चित्रपटाचे अभिनेते होते, प्राण. खरे म्हणजे तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती, की ही जोडी पुढे मुंबईच्या चित्रपट दुनियेतील हिरो-हिरॉईन म्हणून नावारूपाला येईल. 
 

"नई भाभी' द्वारे सुपरहिटची कमाल 
लाहोरमध्ये स्मृती बिश्‍वास आणि डॉ. एस. डी. नारंग यांची भेट झाली. त्या वेळी डॉ. एस. डी. नारंग यांचे "ग्लॅमर' होते. मात्र "नारंगव्हिला'सारखे ग्लॅमर सोडून करिअर एके करिअर एवढेच उद्देश ठेवून त्यांनी काम केले. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा भूमिका पार पाडत असताना त्यांचा स्वतःचा स्टुडिओ होता. त्यांच्या "नई भाभी' या चित्रपटात स्मृती बिश्‍वास यांनी पहिल्यांदा नायिकेची भूमिका साकारली. डॉ. नारंग नायक होते. हा चित्रपट "सुपरहिट' झाला. 
 

कर्तृव्यदक्ष गृहिणीचा प्रवास 
विवाहानंतर हे दांपत्य 1960 मध्ये मुंबईत आले. मग मात्र स्मृती बिश्‍वास यांनी गृहिणी म्हणून आयुष्याची सुरवात केली. त्या आठवणीत रमत स्मृती बिश्‍वास-नारंग म्हणाल्या, की "नारंग व्हिला' या आमच्या बंगल्यात तरणतलाव होता. बंगल्याच्या वरील बाजूला स्टुडिओ होता. तरणतलावाच्या परिसरात "अनमोल मोती' चित्रपटाचे झालेले चित्रीकरण अजूनही आठवते. देव आनंद, व्ही. शांताराम, पी. एल. संतोषी, गुरुदत्त, राज कुमार, बी. आर. चोप्रा, प्रेमनाथ, किशोर कुमार आदींसमवेत नायिका म्हणून भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. राज कुमार यांच्यासमवेत "जागते रहो', भगवानदादा यांच्यासमवेत "समशेर', "बाप रे बाप', तर व्ही. शांताराम यांच्यासमवेत "तीन बत्ती चार रास्ता' हे चित्रपट केले. 


मावळतीला दुर्दम्य इच्छाशक्तीचा कवडसा 
कौटुंबिक प्रश्‍नांच्या मालिकेतून बाहेर पडत स्मृती बिश्‍वास-नारंग या बहिणीच्या सल्ल्यानुसार राजीव आणि जित या दोन मुलांना सोबत घेऊन नाशिकमध्ये आल्या. मावळतीच्या आयुष्यात त्यांच्या बोलण्यातून दुर्दम्य इच्छाशक्तीचा कवडसा डोकावत होता. याही वयात त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य भेटीला येणाऱ्या प्रत्येकाचा ऊर्जास्रोत ठरतो. स्मृती बिश्‍वास-नारंग म्हणाल्या, की "लक्‍झरी' आयुष्य जगण्यासाठी सततच्या कटकटीपेक्षा साधेपणाने जगणे मला आवडते. आमच्याकडे दहा कार होत्या. नाशिकमध्ये रिक्षाने आम्ही प्रवास करतो. पैशापेक्षाही आयुष्य लाखमोलाचे असल्याने सारे काही मी विसरून गेले आहे. इथं दोनवेळचा घास सुखाचा मिळतो आहे. त्यातच पुन्हा माझ्या पतीच्या अस्थींचे विसर्जन गोदावरीत करण्यात आल्याने या शहराविषयी मला असलेला जिव्हाळा मोठा आहे. नाशिककरांनी भरभरून प्रेम केले आहे. इथले हवामान माझ्या जगण्याला उमेद देत आहे. बस्स, अजून काय हवंय! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com