नांदेड महापालिकेसाठी 58 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

नांदेड - नांदेड- वाघळा महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी सरासरी 58 टक्के मतदान झाले. 81 जागांसाठी 578 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गुरुवारी (ता. 12) मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत नवे कारभारी कळतील. 

नांदेड - नांदेड- वाघळा महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी सरासरी 58 टक्के मतदान झाले. 81 जागांसाठी 578 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गुरुवारी (ता. 12) मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत नवे कारभारी कळतील. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यातील ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. चव्हाण यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केला आहे. कोण बाजी मारतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर तरुणाईनेही उत्स्फूर्त मतदान केले. काही ठिकाणी मात्र मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर गुरुवारी सकाळी दहापासून मतमोजणी होणार आहे. आधी 19 प्रभागांची मतमोजणी होईल. ती पूर्ण झाल्यानंतर "व्हीव्हीपॅट' यंत्रणा बसविलेल्या ठिकाणांची मतमोजणी होईल. 

सहा केंद्रावर "व्हीव्हीपॅट' रद्द 
राज्यात पहिल्यादांच प्रायोगिक तत्त्वावर "व्हीव्हीपॅट'चा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर या निवडणुकीत झाला. त्यासाठी प्रभाग क्रमांक दोन (तरोडा बुद्रुक) निवडण्यात आला. या प्रभागातील 37 मतदान केंद्रांपैकी 16 केंद्रांत यंत्रासंदर्भात तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे सहा केंद्रांवर "व्हीव्हीपॅट' रद्द करून नेहमीप्रमाणे "ईव्हीएम'द्वारे मतदान झाले. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी ही माहिती दिली.