विकासाच्या नावाने लोकांना मूर्ख बनविले जातेय - तुषार गांधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

""पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचे दूत म्हणून महात्मा गांधींचा चष्मा जाहिरातून दाखवायला प्रारंभ केला खरा; पण या चष्म्याला लेन्सच नाहीत, त्यामुळे कचराच दिसेना आणि आपण स्वच्छ रस्तेच झाडत सुटलो आहोत,'' 
- तुषार गांधी 

लातूर - देशाचे धोरण ठरविताना शेवटच्या माणसाचा विचार अगोदर व्हावा, अशी महात्मा गांधी यांची अपेक्षा होती. आज मात्र विकासाच्या नावाने लोकांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान सुरू आहे, अशी खरमरीत टीका गांधी विचारांचे अभ्यासक व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केली. 

येथील विद्यार्थ्यांच्या साह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी सहायक मंडळाचे रविवारी (ता. 5) गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी ते "21व्या शतकाची आव्हाने आणि गांधी विचार' या विषयावर बोलत होते. 

गांधी म्हणाले, ""सत्ताधाऱ्यांना प्रश्‍न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरविले जात आहे. जात, धर्म, वंश, प्रांत, भाषा यावरून समाजामध्ये विघटन केले जात आहे. आपल्या समाजात जातींचे प्राबल्य आहे. विविध प्रादेशिक, आर्थिक आणि धार्मिक विचारांच्या दऱ्या आहेत. फक्त चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळेसच आम्हाला देशभक्ती आठवते. आजकाल सरदार पटेल यांची स्तुती करण्याची फॅशन आली आहे आणि बापू मात्र भिंतींची शोभा होऊन बसले आहेत. आम्ही गांधींच्या मार्गाचा शोधच घेण्याचे विसरून चाललो आहोत. गांधीमार्गाचा शोध आपल्या अंतरात्म्यातून घेतला गेला पाहिजे.''