शेतकरी चिंता'तूर' अन्‌ मंत्र्याची विदेशी 'टूर'!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 मे 2017

'आश्‍वासन' आणि 'सहमती'
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा व शेतकरी कर्जमाफी करा, अशी मागणी शिवसेना मंत्र्यांनी केली. यावर, इतर पक्षाच्या व भाजपच्या गट नेत्यांशी बोलून याबाबतचा निर्णय दोन दिवसांत सांगतो. शेतकरी कर्जमुक्‍त झाला पाहिजे अशी सरकारचीही भूमिका आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि शिवसेना मंत्री त्यावर सहमत होत बाहेर पडले.

मुंबई - राज्यातला शेतकरी दररोज आंदोलन करत असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट हे मात्र ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. संसदीय समितीच्या दहा दिवसांच्या राष्ट्रकुल दौऱ्यात फुंडकर व बापट यांचा समावेश आहे. या अभ्यास दौऱ्यात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि काही आमदारांचाही समावेश आहे. 

विधान परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही या दौऱ्याचे निमंत्रण होते. मात्र, त्यांनी राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा असल्याने निमंत्रण नाकारले आहे. 

राज्यात तूर, कांदा, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले असताना कृषिमंत्र्यांच्या विदेश दौऱ्यामुळे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कितपत गंभीर आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या दौऱ्याचे समर्थन केले आहे. 'हे मंत्री अभ्यास दौऱ्यासाठीच गेले आहेत, तिथल्या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल,' असा विश्‍वासही मुनगंटीवार यांनी व्यक्‍त केला.

कर्जमाफीवरून शिवसेनेची ससेहोलपट
शेतकरी कर्जमाफी व तूर खरेदीवरून शिवसेनेच्या भूमिकेतली ससेहोलपट सुरूच असून, आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेत सत्तेतली 'नुरा कुस्ती' शिवसेनेने कायम ठेवल्याचे चित्र होते. शेतकरी कर्जमाफीवरून रोखठोक भूमिका तर सरकार व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मवाळ भूमिका घेतल्याने शिवसेनेची अवस्था 'धरलं तर चावतंय, अन्‌ सोडलं तर पळतंय' अशी झाल्याची चौफेर टीका सुरू झाली आहे.

पक्षातील ग्रामीण भागातल्या आमदारांमधेही या मवाळ भूमिकेवरून प्रचंड अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. केवळ भेटीगाठी घेण्यापेक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक होऊन सरकारमध्ये असल्याचे अस्तित्व दाखवा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी मंत्रिमंडळातून बाहेर पडा, असे आवाहन करत विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या मवाळ भूमिकेवर हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्याच दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कर्जमाफी व तूर खरेदीच्या गोंधळावरून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यासाठी भेट घेतली. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठक असतानाही शिवसेना मंत्र्यांनी त्या अगोदर मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने मंत्रिमंडळात शिवसेनेची धमक नसल्याची टीका सुरू झाली आहे.

सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्यास भाजप कोणताही टोकाचा निर्णय घेऊ शकतो, अशी धास्ती असल्याने सत्तेत राहून सरकारशी लुटुपुटूची लढाई करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ 'नौटंकी' असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे, तर शिवसेना शेतकऱ्यांचा कैवार असल्याचे दाखवत सरकार व शिवसेना यांच्यात 'नुरा कुस्ती' सुरू असल्याचा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर शिवसेनेच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात बसू दिले जाते हेच नवल, असा म्हणत सत्तेपुढे शेतकरी कर्जमाफी हा शिवसेनेचा केवळ देखावा असल्याची टीका केली.