भाजपबद्दल अल्पसंख्यांकांच्या मनात भीती- शरद पवार

टीम ई सकाळ
गुरुवार, 11 मे 2017

विरोधी पक्षांनी राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढलेल्या संघर्ष यात्रेबद्दल बोलताना 'संघर्ष यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला. त्याची सरकारला दखल घ्यावी लागली,' असे ते म्हणाले. 

मुंबई : देशातील अल्पसंख्यांकांच्या मनात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबद्दल चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अलीकडे देशात बदललेल्या राजकीय समीकरणांची चर्चा केली. तसेच, सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीका केली. 

पवार म्हणाले, "गोरक्षक नावाची संकल्पना अलीकडे पुढे आली आहे. जिथे गोहत्येवर बंदी आहे त्या राज्यांमध्येही गायींची वाहतूक करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. गोहत्याबंदी असणाऱ्या राज्यांमध्ये कोणी सहसा बेकायदेशीररीत्या गोहत्या करीत नाही. 

विरोधी पक्षांनी राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढलेल्या संघर्ष यात्रेबद्दल बोलताना 'संघर्ष यात्रेमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला. त्याची सरकारला दखल घ्यावी लागली,' असे ते म्हणाले. 

1977 साली काँग्रेसचा पराभव झाला. आता किमान 25 वर्षे काँग्रेसचं सरकार येणार नाही, असा अंदाज अनेक माध्यमांनी त्यावेळी व्यक्त केला होता. परंतु, 1980 मध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेत आला. कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा प्रभाव फार काळ राहत नाही, असे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर इंडिया शायनिंग, फील गुडची सर्व माध्यमांमध्ये चर्चा होती. मात्र, त्यानंतर पुन्हा देशात सत्तांतर झाले, आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले, असे त्यांनी सांगितले.  

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना भाजपच्या राजकीय भूमिकांबद्दल ते म्हणाले, "देशाच्या नेतृत्वाची भूमिका कायम पाहिजे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत त्यांनी धोरण बदलून जातीय समीकरणांनुसार समुदायांची मते मिळवली. समाजवादी पक्षानेदेखील या निवडणुकीत टोकाची भूमिका घेतली. त्याचाही फायदा भाजपला यूपीमध्ये झाला, असं माझं वैयक्तिक मत आहे."