सांगली-मिरजेच्या मातीत लोकमान्यांच्या स्मृतींचा सुगंध !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मिरज - स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी लेखणी आणि वाणीने इंग्रजी रावटीला सतत हादरे दिले त्या लोकमान्य टिळक यांच्यासंबंधित आठवणींची स्मृतिफुले आजही सांगली-मिरजेत दरवळत आहेत. तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचा सांगलीचा भाग  म्हणजे क्रांतिकारक, साहित्यिक आणि कलावंतांचा. त्यामुळे या परिसरात लोकमान्यांचे सतत येणे-जाणे होते. अनेकांशी त्यांचा जवळचा ऋणानुबंध होता. 

मिरज - स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी लेखणी आणि वाणीने इंग्रजी रावटीला सतत हादरे दिले त्या लोकमान्य टिळक यांच्यासंबंधित आठवणींची स्मृतिफुले आजही सांगली-मिरजेत दरवळत आहेत. तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचा सांगलीचा भाग  म्हणजे क्रांतिकारक, साहित्यिक आणि कलावंतांचा. त्यामुळे या परिसरात लोकमान्यांचे सतत येणे-जाणे होते. अनेकांशी त्यांचा जवळचा ऋणानुबंध होता. 

कोल्हापुरातील ताई महाराज खटल्याच्या काळात त्यांचे वास्तव्य काही काळ मिरजेत होते. थोर इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे हे त्यांचे स्नेही. १९०६ मध्ये तत्कालीन सरकारी थिएटरमध्ये (आजचे बालगंधर्व) गुप्तमंजूष नाटक झाले. त्यासाठी लोकमान्य, बालगंधर्व आणि राजर्षी शाहू महाराज हे दिग्गज एकत्र आले होते. १५ फेब्रुवारी १९२० रोजी सांगलीत ज्योतिष संमेलन झाले. त्यासाठीही ते आले होते. मिरजकरांनी सरकारी थिएटरमध्ये वासुदेवशास्त्री  खरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कारही केला. टिळक यांचे नुकतेच विलायतेहून आले होते. त्यामुळे खरे व टिळक यांच्या भेटीचे वर्णन ‘भरतभेट’ असं करण्यात आलं. त्याचवेळी अंबाबाई तालीमलाही त्यांनी भेट दिली.

त्यांनी केसरी वृत्तपत्र सुरू करायचं ठरवलं; तेव्हा ‘केसरी’ हे नाव  वासुदेवशास्त्री खरे यांनीच सुचवलं. लोकमान्यांवर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरला, तेव्हा तो चालवण्यासाठी मिरजेतून वर्गणी गोळा करण्यात खरे अग्रेसर होते. मिरजेतील नायकिणींनीही वर्गणी देऊ केली होती. नायकिणींच्या दानशूरतेचे स्मरण टिळक यांनी ठेवले. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. तो मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात उपलब्ध आहे. 

गीतेतील कर्मयोगाचे रहस्य सांगणारा एक लेख मिरजेतील विश्‍वनाथ कबाडेशास्त्री यांनी लिहिला आहे. लोकमान्यांच्या गीतारहस्यापूर्वीच तो पूर्ण झाला होता. ‘गीतार्थकथा अथवा विवेकवाणी’ असे त्याचे शीर्षक आहे. टिळकांनी त्याची दखल घेतली; कबाडेशास्त्रींनी आपले विचार अगोदरच मांडल्याचे सांगितले. ‘गीतार्थकथा’ हा ग्रंथ ‘गीतारहस्य’ पेक्षा सोप्या भाषेत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. अशाच प्रकारे लोकमान्यांची अनेक आठवणी स्मृतिफुलांच्या स्वरूपात आजही सांगली-मिरजेत दरवळत आहेत.

राजर्षी शाहू आणि लोकमान्य
लोकमान्यांच्या अखेरच्या दिवसांत राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना मिरजेतील आपल्या बंगल्यात येऊन राहण्यास सुचविले होते. येथे डॉ. विल्यम वॉन्लेस यांच्याकडून योग्य वैद्यकीय उपचार मिळतील, अशी त्यांना आशा होती.