मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये चूक; नेटिझन्सच्या झटपट प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सोशल मिडियावर सक्रिय असलेले मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका पोस्टमध्ये सांगली जिल्ह्यातील एक गाव सातारा जिल्ह्यात असल्याचा उल्लेख केल्याने नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अर्थातच चूक लक्षात आल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी चूक दुरुस्त केली.

सांगली - सोशल मिडियावर सक्रिय असलेले मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका पोस्टमध्ये सांगली जिल्ह्यातील एक गाव सातारा जिल्ह्यात असल्याचा उल्लेख केल्याने नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अर्थातच चूक लक्षात आल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी चूक दुरुस्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजीटल इंडिया' या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील बहुतेत नेते सोशल मिडियावर सक्रिय असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्याला अपवाद नाहीत. दररोजच्या कार्यक्रमांचे अपडेटस ते सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. वेगाने अपडेटस देण्याच्या नादात बऱ्याचदा चुका होत असतात. असाच प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. शुक्रवारी फडणवीस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील मल्लेवाडी या गावाला भेट दिली. या गावात त्यांनी सुखकर्ता बंधाऱ्याचे उद्‌घाटन केले. त्यानंतर या कार्यक्रमाची छायाचित्र त्यांनी फेसबुकवर अपलोड केले. छायाचित्रासोबत माहिती देताना त्यांनी 'सातारा जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील मल्लेवाडी' असा उल्लेख केला. काही क्षणातच नेटिझन्सनी या पोस्टची आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चुकीची खिल्ली उडविली. अर्थातच चूक लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ती दुरुस्त केली. मात्र, तोपर्यंत सोशल मिडियावर हा चर्चेचा विषय झाला होता.