'एमआयटी', "सिंबायोसिस' विधेयके मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास करण्याकरिता डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाची स्थापना करणे, तसेच राज्यातील कौशल्य शिक्षणाचा विकास करण्याच्या दृष्टीने सिंबायोसिस कौशल्य विकास व मुक्त विद्यापीठ हे स्वयं अर्थसहायित विद्यापीठ स्थापन करणारी दोन्ही विधेयके आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत ही दोन्ही विधेयके मांडली. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याच्या दृष्टीने संशोधक वृत्तीचा विकास करणे, उच्च गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र उभारणे, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता उच्चतम पातळीवर विकसित करणे, रोजगाराभिमुख उद्योजक निर्माण करणारे व नावीण्यपूर्व व कौशल्य आधारित शिक्षण उपलब्ध करून देणे आदी विशेष व्यवस्था या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठामध्ये असतील, असेही तावडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सिंबायोसिस कौशल्य विकास व मुक्त विद्यापीठ या स्वयंअर्थसहायित विद्यापीठामध्ये मेक इन इंडिया, स्कील इंडियासारख्या उपक्रमांना पूरक कौशल्यावर आधारित मनुष्यबळ विकासासाठी या विद्यापीठाची आवश्‍कता आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्यावर आधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.