महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद कालवश

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जुलै 2016

नवी दिल्ली - भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांचे आज (बुधवार) गुडगाव येथील एका रुग्णालयामध्ये मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. 1980 मध्ये झालेल्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते. शाहिद यांनी संघामध्ये "फॉरवर्ड‘ म्हणून खेळताना त्यांच्या असामान्य गुणवत्तेचा प्रत्यय घडविला होता. 

शाहिद यांना पोटामध्ये असह्य वेदना होऊ लागल्याने गेल्या 29 जून रोजी त्यांना बनारस हिंदु विद्यापीठामधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी ढासळल्याने त्यांना तातडीने दिल्ली येथे हलविण्यात येऊन गुडगावमधील रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे सुमारे तीन आठवडे उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत आज मालविली. शाहिद यांच्यामागे त्यांची पत्नी परवीन शाहिद आणि मोहम्मद सैफ व हीना शाहिद या दोन मुलांचा परिवार आहे. 

अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेल्या शाहिद यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फ्रान्समधील युवा विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळतानाच आपली छाप पाडली होती. याचबरोबर, सुमारे याच काळात मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेमधील त्यांच्या खेळामुळे भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघामधील खेळाडू अक्षरश: अचंबित झाले होते. शाहिद यांचा खेळ वेगवान होता व चेंडू "ड्रिबल‘ करण्याची पद्धत अत्यंत प्रभावित करणारी होती. शाहिद यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्यांचा देशभरात चाहतावर्ग तयार झाला होता. 

शाहिद यांना 1981 मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय, 1986 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. हॉकीमधून निवृत्ती घेतल्यानंतर शाहिद हे त्यांचे जन्मस्थान असलेल्या वाराणसीमध्येच भारतीय रेल्वेमध्ये काम करत होते.

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी