हिंदू राष्ट्रासाठी भागवतांना राष्ट्रपती करायला हवे - राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

राष्ट्रपतिपदाची चर्चा "मातोश्री'वरच
एनडीएच्या स्नेहभोजनाची चर्चा फक्त प्रसिद्धिमाध्यमांमध्ये सुरू आहे. स्नेहभोजनाचे निमंत्रण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिळालेले नाही. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी हे स्नेहभोजन असेल, तर ती चर्चा आणि स्नेहभोजन "मातोश्री'वरच होईल, अशी परखड भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता आहे. "हिंदू राष्ट्रासाठी भागवत यांना राष्ट्रपती करायला हवे,' अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडली आहे.

या पदासाठी अडवानी यांच्या नावाची चर्चा होती. आता सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव पुढे आले आहे. भागवत यांच्या नावाला शिवसेनेचीही पसंती असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. हिंदुत्ववादी राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, प्रामुख्याने भाजपने सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले पाहिजे, असे मत राऊत यांनी मांडले आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. अडवानी आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत; पण शिवसेनेतून भागवत यांना पसंती मिळत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.