मदर तेरेसा यांच्या कथित चमत्कारांचे दावे सिद्ध करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

सातारा - दीनदुबळ्यांच्या सेवेचे काम हाच मदर तेरेसा यांच्या संत प्रवृत्तीचा पुरावा मानला जावा. तरीही त्यांनी दोन चमत्कार केल्याचा दावा व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस करत असल्यास त्यांनी चमत्कारांचे दावे सिद्ध करावेत, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिले आहे.

मदर तेरेसा यांनी संतपदाची कसोटी असलेली दुसऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद बहाल करण्यात आले आहे. या अनुषंगाने श्री. पाटील यांनी जाहीर आव्हान दिले आहे. याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की ""संतपदासाठी मदर तेरेसा यांच्या सेवाकार्यासोबत चमत्काराच्या निकषाची गरज नाही. आरोग्यसेवेचे मानवतावादी काम त्यांना संत म्हणण्यासाठी पुरेसे आहे. यासाठी चमत्कारची अट ठेवणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्य विरोधात असल्याने "अंनिस‘ त्याचा निषेध करते. तेरेसा यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्याने गंभीर स्वरूपाचे आजार बरे होतात, असा समज लोकांमध्ये पसरवणे हे त्यांना शास्त्रीय उपचारांपासून दूर नेणारे ठरते. म्हणूनच चमत्काराची अट लोकांच्या शोषणाला कारणीभूत ठरू शकते. अवैज्ञानिक चमत्काराची अट हे त्यांच्या मानवतावादी व सेवाभावी कामाचे अवमूल्यन आहे.‘‘

ख्रिस्ती धर्मपीठाने खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओला दिलेल्या शिक्षेबद्दल तीनशे वर्षांनी का होईना माफी मागून सत्यशोधनाविषयी जी आस्था दाखवली होती, त्याप्रमाणे आतादेखील ख्रिस्ती धर्मियांच्या सर्वोच्च असणाऱ्या व्हॅटिकन सिटीतील धर्मपीठाने संतपदासाठी चमत्काराची अट रद्द करावी आणि नवीन पायंडा तयार करावा, अशी मागणीही श्री. पाटील यांनी केली आहे.