मिसेस आठवले राजकारणात सक्रिय?

Seema Ramdas Athavale
Seema Ramdas Athavale

मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पत्नी सौ. सीमा आठवले गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. पक्षात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी 'मॅडम' जातीने लक्ष घालत असल्याचे अधिकृतरीत्या सांगतिले जात आहे. मात्र, आठवलेंच्या राजकीय वारसदार म्हणून मॅडमना 'प्रमोट' केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद आरपीआयच्या वाट्याला आले तर त्यावर मिसेस आठवलेंची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे.

अपवाद वगळता सौ. सीमा आठवले या आरपीआयच्या कोणत्याही कार्यक्रमात सहसा सहभागी होत नाहीत. त्याच्याकडे संघटनेचे कोणते अधिकृत पदही नाही. गेल्या अनेक वर्षांपासून फोर्ट परिसरात असलेल्या आरपीआयच्या कार्यालयामध्येही त्या कधीच आल्या नव्हत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मॅडम पक्षाचे मेळावे आणि आंदोलनांमध्ये हजेरी लावू लागल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आरपीआयच्या कार्यलयालाही भेट दिली. त्यावेळी महिला आघाडीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक महिला उमेदवारांचे अर्ज यावेळी मॅडमच्या हस्ते स्विकारण्यात आले. या इच्छुकांच्या प्राथमिक मुलाखतही यावेळी त्यांनी घेतल्या.

'सीमा ताईंच्या येण्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आला असून त्यांनी सक्रिय राजकारणातही यायला हवे, अशी प्रतिक्रिया आरपीआयच्या एका महिला कार्यकर्तीने व्यक्त केली. मात्र, महामंडळावर वर्णी लागण्यासाठी आठवले साहेबांकडे पाठपुरावा सुरू असताना पक्षाच्या कामात मॅडमने सक्रिय होणे, हे दुसऱ्या फळीतील काही नेत्यांना खटकलेही आहे. उच्चविद्याविभूषित असलेल्या मॅडमना राजकारणातील खाचखळगे एकदा का कळले, की मग आपोआपच वारसा त्यांच्याकडे चालत येईल आणि महामंडळावर त्यांचीच वर्णी लागते की काय, अशी भीतीही या दुसऱ्या फळीतील नेत्यांना वाटू लागली आहे.

महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहाखातर उमेदवारी उर्ज स्वीकारण्यासाठी तिथे गेले. याआधीही महिला आघाडीच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. पण सध्या संघटनेत महिलांची संख्या वाढविण्यासाठी सक्रिय झाले असून राजकीय महत्वांकाक्षा नाही. साहेबांप्रमाणे भाषण चांगले व्हावे म्हणून शीघ्र कविता करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- सीमा आठवले

पत्नीला राजकीय वारसदार करण्याचा कोणताही विचार तूर्तास तरी नाही. महिला आघाडीने आग्रह केल्याने त्या आरपीआय कार्यालयात गेल्या होत्या.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com