राणेंना गरज श्रद्धा अन्‌ सबुरीची 

Narayan rane
Narayan rane

राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करायला उत्सुक आहेतच; पण मंत्रिपद मिळेल या अपेक्षेतही आहेत. पण पक्षप्रवेशाची वेळ त्यांना ठरविता येणार नाही, हे तितकेच खरे. 

गेली काही दशके राज्याच्या राजकारणावर छाप उमटविणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अस्वस्थ आहेत. सध्याचा काळ म्हणजे मागची पंधरा वर्षे. शिवसेनाविरोधी बाकांवर असताना विरोधी पक्षनेतेपद राणे यांच्याकडे होते. मुख्यमंत्रिपदाची छोटीशी कारकीर्द नावावर असलेले राणे विरोधी पक्षनेते म्हणून गाजले होते. अचूक अभ्यास, सरकारी नियमांची खडान्‌ खडा माहिती, प्रशासनाची जाण व कोणताही मुलाहिजा न बाळगता सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची सवड यामुळे विरोधी नेतेपदाची त्यांची कारकीर्द लक्षवेधी ठरली. सारे आलबेल असताना राणे यांनी अचानक पक्ष बदलला.

शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. मालवणात त्यांना हरवण्यासाठी गेलेली चतुरंग सेनाही राणेंच्या करिष्म्यापुढे निष्प्रभ ठरली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनाही राणे यांनी फोडले. तसेच विनायक निम्हण, माणिकराव कोकाटे यांच्यापासून थेट विदर्भापर्यंतचे आमदार कॉंग्रेसवासी झाले. या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे आश्‍वासन कॉंग्रेसश्रेष्ठींनी दिले होते, असे म्हणतात. मात्र विलासराव देशमुख यांच्या आसनाला राणे धक्का लावू शकले नाहीत. मुख्यमंत्री बदलाची वेळ आली, तेव्हाही राणेंऐवजी अशोक चव्हाणांची निवड केली गेली. राणे या सर्व घडामोडींमध्ये महसूल, उद्योग अशी खाती सांभाळत राहिले. शिवसेनेतील त्यांच्या आक्रमकतेला पक्षीय चेहरा गमवावा लागला. पण व्यक्तिगत पातळीवर राणेंना स्वभाव बदलता आला नाही. या स्वभावाचा लाभ घ्यायचा प्रयत्न कॉंग्रेस राजवटीने शेवटच्या टप्प्यात केला. मराठा आरक्षणासारख्या कठीण विषयात समाजाला न्याय देण्याची जबाबदारी राणेंवर सोपविली गेली. खरे तर तोवर निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते. याच दरम्यान राणेंनीही स्वतःच्या दोन्ही मुलांना राजकारणात आणले.

थोरला नीलेश खासदार म्हणून निवडून आला, तर नीतेश धडपडत राहिला. कालांतराने त्याच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी राणे स्वतः पराभूत झाले व सुरक्षित मतदारसंघात मुलाला जिंकवून आणले. पराभवानंतरही कायम चर्चेचा विषय ठरलेले राणे आता भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत. कालिदास कोळंबकर वगळता एकही सहकारी समवेत नाही, अशा स्थितीत राणे भाजपमध्ये प्रवेश करायला तर उत्सुक आहेतच; शिवाय मंत्रिपद मिळेल या अपेक्षेतही आहेत. मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, तसेच कोकणपट्टीत यश मिळत नसल्याने जागा जिंकण्यासाठी राणेंना भाजपमध्ये प्रवेश मिळेलही; पण तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मर्जीनुसार! त्यामुळेच पक्षप्रवेशाची वेळ राणेंना ठरविता येणार नाही. निवडणुकीचे गणित पाहिले तरी भाजपला शेवटच्या टप्प्यात यश मिळवून देणारे लोक हवे असतात. शंकरसिंह वाघेला यांच्याकडे गुजरातेत कृपाकटाक्ष टाकला गेला, तो निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना. महाराष्ट्रातही हेच घडेल, हे राणे परिवाराच्या लक्षात येते आहे काय? कोळंबकर आणि नीतेश राणे यांना पक्ष बदलून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले गेले, तरी मतदारसंघाचे वातावरण कितपत अनुकूल आहे, याचा भाजप पक्षश्रेष्ठी विचार करतील. पोटनिवडणुकीला आमंत्रण देणे ही भाजपची गरज नाही.

राणेंना ती जिंकता आली नाही, तर काय होईल याचा विचार भाजप निश्‍चित करेल. त्यामुळेच निवडणुकीला एक-दीड वर्ष असताना पोटनिवडणुका घ्यायच्या काय, याचा विचार केला जाईल. भाजपमध्ये तसा विचार होत असतो. भाजपमध्ये गेलेल्या दलबदलूंच्या विरोधात एकच उमेदवार उभा करायचा आणि त्याला निवडून आणायचे असा विचार कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने केला होता. त्यामुळेच भाजपच्या वाटेवर असलेल्या काही आमदारांचे प्रवेश थांबविले गेल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभाराला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. महाराष्ट्रात तसे घडते आहे काय, हा प्रश्‍न असला तरी ते कारण पुढे करत राणेंवरच्या आरोपांची जंत्री तयार केली जाईल आणि ती टीकेचा विषय होईल. स्वच्छ प्रतिमेला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या फडणवीसांना अशा टीकेला निमंत्रण देण्यात स्वारस्य नसावे. आज सरकारचा भाग असलेली शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. राणेंनी मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत जाण्याचीही तयारी दाखविली होती, असे म्हणतात. त्यामुळे राणेंचे भाजपमध्ये जाणे शिवसेनेला आवडणार नाही. सरकारला वाचविण्यासाठी अनेक "अदृश्‍य हात' तयार आहेत, असे फडणवीस सांगत असले, तरी राणेंच्या प्रवेशासाठी ते या हातांना साद घालतील काय, हा प्रश्‍न उरतो. राणेंना दिल्लीत जायचे असेल तरी फेब्रुवारी 2018पर्यंत राज्यसभेतील जागा रिकामी होणार नाही.

मोदी-शहा यांचा घराणेशाहीला विरोध आहे, असे म्हणतात. दानवे आणि फुंडकर यांच्या मुलांना उमेदवारी मिळवून देताना त्रास झाला होता. अशा परिस्थितीत राणे यांच्याबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांना भाजप कितपत संधी देईल ही शंकाच आहे. मराठा समाजातील आक्रमक नेता आणि कोकणात हवा असलेला प्रवेश या राणेंच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र या शक्तिस्थळांवर प्रवेशाच्या घाईने कुरघोडी केली, तर ते घरीच बसण्याची शक्‍यता आहे. "राणे भाजपत गेले तर आम्ही काही न करता कोकण जिंकू,' असा प्रचार शिवसेनेने सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकतात काय? सातत्याने निवडणूक जिंकणाऱ्या फडणवीसांना मराठा नेतृत्वाची गरज वाटते काय, हेही राणेप्रवेशातील प्रश्‍न आहेत. देशातील प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याप्रमाणे राणे हेही मनाने भाजपात गेले आहेत. मात्र श्रद्धा आणि सबुरी हे राजकारणातले आवश्‍यक घटक आहेत. विलासराव सांगत, राणेंच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर ते हे वाक्‍य अधिक जोमाने उच्चारत. मुत्सद्दी फडणवीसही न बोलता तेच सुचवत आहेत काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com