मुंबई - राज्यातील देशी दारूची दुकाने, बिअर बार, वाइन शॉप यास यापुढे देवी-देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव देता येणार नाही. याबाबतची अधिसूचना उत्पादन व शुल्क विभागाच्या वतीने काढण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यातील देशी दारुची दुकाने, बिअर बारला महापुरुष, देवी- देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव देता येणार नाही, याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे समजते. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारूची दुकाने, बिअर बारला महापुरुषांची नावे न देण्याची मागणी केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. बैठकीत देशी दारूची दुकाने, बिअर बार आणि परमिट रूमला महापुरुषांची तसेच देवी- देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत कामगार विभाग कायद्यात सुधारणा करून बदल केले जाणार आहेत.
|