सिंधुदुर्गातील पाटबंधारे योजनेला 146 कोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - कॉंग्रेसमुक्‍त होत स्वत:चा पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अखेर राज्य सरकारने विकासकामांसाठी मदतीचा "हात' दिला आहे. राणे यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी लघू पाटबंधारे योजनेस (ता. दोडामार्ग) 145 कोटी 99 लाख 60 हजार रुपयांच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार 345 हेक्‍टर एवढी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

कोकण विकासाची हाक देत राणे यांनी कायम कोकणातल्या विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यातच कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे एकाकी असल्याची राजकीय चर्चा सुरू होती. मात्र, राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षला भारतीय जनता पक्षाने एनडीएचा मित्रपक्ष म्हणून निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राणे यांचा पक्ष आता भाजपचा सहयोगी पक्ष असल्याने राणे यांच्या राजकीय वर्चस्वासाठी त्यांच्या विभागातल्या प्रलंबित विकासकामांना अभय देण्याचा मानस सरकारचा आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाने नारायण राणे यांचे सरकारमधील महत्त्व वाढण्याचे सूचित केले जात आहे.