राज्यातील 23 हजार अंगणवाडी कर्मचारी रुजू - पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषण नुकतीच केली आहे. ही मानधनवाढ मान्य करून राज्यातील 23 हजार 533 अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर झाल्याचा दावा महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे यांनी चर्चा केली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

मुंडे म्हणाल्या, की काही अंगणवाडी संघटना मात्र अट्टहास करत असून, अधिक मानधनवाढीसाठी अजूनही संपावर आहेत. बालकांना उपाशी ठेवणे अत्यंत चुकीचे असून, पोषण आहारपुरवठा ही दैनंदीन अत्यावश्‍यक बाब आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवरही शासन सकारात्मक असून, त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही तातडीने संप मागे घेऊन बालकांना उपाशी न ठेवता त्यांचा पोषण आहारपुरवठा सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.

'मानधनवाढीनंतर राज्यात कालपर्यंत 11 हजार 235 अंगणवाडी सेविका, 11 हजार 86 मदतनीस व एक हजार 212 मिनी अंगणवाडीसेविका कामावर हजर झाल्या आहेत. याशिवाय 1 हजार 131 इतक्‍या "आशा' कर्मचाऱ्यांमार्फत पोषण आहारपुरवठ्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. कालपर्यंत राज्यातील साधारण 28 हजार 539 अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारपुरवठ्याचे कामकाज सुरू झाले असून, उद्याप साधारण 50 हजार अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारपुरवठा सुरू होईल,'' असा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्‍त केला.