34 लाख शेतकऱ्यांना दहा हजार देणार - पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - राज्यातील थकबाकीदार 34 लाख शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीसाठी दहा हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. तसेच या संदर्भातील सरकारी आदेश तातडीने काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, ""राज्य सरकारने शेतकऱ्यांना निकषांसह कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. निकष ठरवण्यासाठी लवकरच समिती स्थापन केली जाईल. या समितीत शेतकरी सुकाणू समितीच्या प्रतिनिधींसोबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही सहभागी केले जाईल. विरोधकांना विश्वासात घेऊन आणि मतभेदांना फाटा देत एकमताने शेतकरी कर्जमाफीची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचे फायदे मिळवून दिले जातील. राज्यात एक कोटी 36 लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी 34 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत.

कर्जमाफीत या शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे. राज्यात शेतकरी सध्या खरिपाच्या तयारीत आहेत. मात्र, कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हंगामासाठी तातडीने मदत व्हावी, यासाठी त्यांना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. याला राज्य सरकार स्वतः हमी देणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून नंतर ही रक्कम वजा केली जाणार आहे.''