अमित शहा-राणे यांची आज दिल्लीत भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उद्या (ता. 25) दिल्लीत भेट होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उद्या (ता. 25) दिल्लीत भेट होण्याची शक्‍यता आहे.

नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू असताना राणे यांनी अपेक्षेप्रमाणे तीन दिवसांपूर्वी कॉंग्रेसला रामराम केला. नारायण राणे यांची पुढील रणनीती काय असेल यावर चर्चा सुरू असतानाच उद्या दिल्लीत अमित शहा यांना भेटणार असल्याचे वृत्त आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासगी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी राणे शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ते निमित्त असल्याची चर्चा आहे. कारण सध्यातरी राणे यांच्यासमोर नवीन राजकीय पक्ष काढणे किंवा भाजपमध्ये प्रवेश करणे, असे दोनच पर्याय शिल्लक आहेत. नवीन पक्ष काढून बस्तान बसविण्याचे आव्हान कठीण असल्याने भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःचे आणि पुत्रांचे पुनर्वसन करण्याचा पर्याय राणे यांनी निवडल्याची चर्चा आहे. दरम्यान, आणखी सव्वादोन वर्षे शिवसेनेसोबत सत्तेचा गाडा हाकायचा असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय राणे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार नाहीत. मात्र, अमित शहा यांनी निर्णय घेतल्यास राणेंचा भाजपप्रवेश सुकर होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.