‘मुदतपूर्व’ झालीच तर आम्हीच जिंकू - अमित शहा

‘मुदतपूर्व’ झालीच तर आम्हीच जिंकू - अमित शहा

मुंबई - प्रत्येक जागा, प्रत्येक निवडणूक भाजप पक्ष ‘शतप्रतिशत’ जिंकण्यासाठीच लढत असतो, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे; मात्र समजा मुदतपूर्व निवडणूक झालीच, तर आम्ही त्या लढवू आणि जिंकू, असा आत्मविश्‍वास शहा यांनी या वेळी जागवला. तसेच शिवसेना आमचा साथीदार आहे, आम्ही आमचे पाहू, असा टोमणा पत्रकारांना मारला.

वेगळ्या विदर्भासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट आहे. वेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा विरोध असला तरी त्यांना राजी केले जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्व घटक पक्षांना आम्ही विश्वासात घेत आहोत. मित्र पक्षांकडून राष्ट्रपतिपदासाठी जी नावे सुचविली जात आहेत, त्यावर विचार करून चर्चा होईल. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू असून, त्यांनी सूचवलेल्या नावांचाही विचार होऊ शकतो, असे शहा यांनी सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना शहा यांनी मात्र संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत मौन पाळले. ‘आपणही नावे सुचवा. त्याचाही विचार आम्ही करू,’ असे हसतहसत त्यांनी पत्रकारांना विचारले.

शहा यांनी देवेंद्र फडणवीस सरकारची स्तुती केली. पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामविकास, शहर विकास, जलसंपदा आणि शेतीच्या क्षेत्रात फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. महाराष्ट्राचा कृषी विकासदर वाढवण्यात राज्य सरकारने यश मिळवले, अशा शब्दात शहा यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकाऱ्यांनी केलेले आंदोलन फडणवीस सरकारने अत्यंत संवेदनशील पद्घतीने हाताळल्याचे प्रशस्तिपत्रकही शहा यांनी दिले.

शिवसेना करणार प्रश्‍न
‘‘आ पण ज्या राज्यात पक्षबांधणीसाठी जातो, तेथील सहयोगी पक्षाला भेटतो, त्यामुळे रविवारी (ता. १८) होणाऱ्या ‘मातोश्री’ भेटीला फारसे महत्त्व देऊ नका,’’ असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले असले, तरी शिवसेना मात्र या सदिच्छा भेटीत राष्ट्रपतिपदासाठी भाजपच्या मनातला उमेदवार कोण, हा प्रश्‍न करणार आहे. विरोधी पक्षाने अद्यापपर्यंत कोणतेही नाव पुढे केले नसल्याने सत्तारूढ भाजपशी फटकून वागण्यात अर्थ नाही, असा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे. एकूण ६३ आमदार आणि १८ खासदारांच्या बळावर राष्ट्रपतिपदाच्या  निवडणुकीत वेगळे वागून काहीही साध्य होणार नाही याची कल्पना असल्याने सबुरीचे धोरण हे शिवसेनेचे सूत्र असेल असे समजते. ज्येष्ठ नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘भाजपने त्यांच्या मनात नाव असेल तर ते सांगावे. अर्थात, त्यांच्या पक्षाने अद्याप कोणतेही नाव पुढे आणलेले नाही, त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आणि कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावावर विचार करावा, अशी विनंती शिवसेनेतर्फे केली जाईल असे वाटते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com