फडणवीस नाही, 'फसणवीस' सरकार - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीचे खोटे आकडे जाहीर करून राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे हे चुकीचे आहेत, अशी कबुली राज्याच्या सहकारमंत्र्यांनीच दिली आहे.

मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीचे खोटे आकडे जाहीर करून राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे हे चुकीचे आहेत, अशी कबुली राज्याच्या सहकारमंत्र्यांनीच दिली आहे.

मुंबईत शेती होते आणि शेतकरी आहेत असा महान शोध राज्य सरकारने लावला आहे. यावरून राज्यात फडणवीस नाही, तर "फसणवीस' सरकार आहे, हे स्पष्ट झाल्याची आक्रमक टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली.

पक्षाचे मुख्यालय टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने शेतकऱ्यांची "ऐतिहासिक' फसवणूक केल्याची टीका करीत अशोक चव्हाण म्हणाले की, सरकारच्या या फसवणुकीच्या संदर्भात राज्यभरात कॉंग्रेस आक्रमकपणे भंडाफोड करणार आहे.

त्यासाठी सोमवारी (ता.10) कॉंग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत वर्धा जिल्ह्याचे नावच नाही; पण मुंबईत मात्र 813 शेतकरी असल्याचा शोध सरकारने लावला आहे. मुंबईत शहरात नेमकी कुठे शेती होते? याची माहिती सरकारने जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

एकूण कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची दिलेली संख्या ही जास्त आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आकडे असत्य आहेत, हे स्पष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आकड्यांची परिस्थितीही अशीच आहे. यातच राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी चुकीची आहे, हे स्वतःच सांगितले आहे. राज्यातील जनतेला खोटी आकडेवारी सांगून जनतेची फसवणूक केल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. दरम्यान, कॉंग्रेसने माहिती अधिकारात राज्यातील संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी देखील मागितली आहे.

संपूर्ण माहिती योग्यच - मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच सरकार याबाबतचा तपशील मांडणार असल्याचे ते म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले...
. मुंबईत शेतकरी हा सरकारचा महान शोध !
. कर्जमाफीचा भंडाफोड राज्यभरात करणार
. कॉंग्रेस नेत्यांची सोमवारी बैठक