जीएसटीमुळे मुंबईत भाजप खुशीत, तर शिवसेनेला चिंता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यापासून मुंबई महापालिका राजकारणात भारतीय जनता पक्ष खुशीत आहे; तर शिवसेनेला चिंता सतावत आहे.

मुंबई - वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यापासून मुंबई महापालिका राजकारणात भारतीय जनता पक्ष खुशीत आहे; तर शिवसेनेला चिंता सतावत आहे.

मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेसाठी "करो या मरो'चा विषय असतो. यासाठी शिवसेनेने मुंबईत संघटनात्मक बांधणी अगदी तळागाळातून केली आहे. तरीही अलीकडे महापालिकेत सत्ता राखताना शिवसेनेची भाजपपुढे दमछाक झाली होती. शिवसेनेची आर्थिक रसद कमी करण्याची प्रत्येक संधी भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी शोधली आहे. मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा खूप मोठा आहे. शिवसेनेच्या या आर्थिक डोलाऱ्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपकडून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या केले जात असल्याचे सांगितले जाते.

जीएसटी लागू होण्याच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेला 7 ते 8 हजार कोटींच्या आसपास जकातीचे महसुली उत्पन्न वर्षाकाठी मिळत होते. मात्र, "जीएसटी' लागू केल्याने जकातीच्या महसुलावर महापालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. सुमारे 37 हजार कोटी रुपये इतका वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्रोतावर "जीएसटी'मुळे मर्यादा येणार आहेत. ही बाब भाजपसाठी मुंबईत आनंददायी असल्याने भाजप नेत्यांना आनंदाचे भरते आले आहे.
मुंबईत भाजप नेत्यांनी "जीएसटी'चे स्वागत ढोल-ताशांनी केले आहे.

शिवसेनेच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या, की मुंबईवर वर्चस्व राखता येईल, असा तर्क भाजप नेत्यांनी बांधला असतानाच "जीएसटी'मुळे ही आयती संधी चालून आली आहे. यामुळे मुंबईतील भाजप नेते सध्या खुशीत आहेत. तर, शिवसेनेच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे. "जीएसटी'मुळे बुडणारे उत्पन्न नेमके अन्य मार्गाने कसे उभारायचे, याचा विचार शिवसेना करीत आहे.