शिवसेनेच्या आंदोलनामुळे भाजप हैराण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेच्या नव्या भूमिकेमुळे भाजप हैराण झाला आहे. महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भडकलेले दर याविरोधात राज्यभरात शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिवसेनेच्या या नव्या भूमिकेमुळे भाजपत अस्वस्थता वाढली असून शिवसेनेला कसे थोपवायचे, याची चिंता भाजपला लागली आहे.

केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांची ध्येयधोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात खरमरीत टीका करण्यास शिवसेना मागेपुढे पाहत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेचे मंत्री, नेते, पदाधिकारी भाजपवर तोंडसुख घेत असतात. सत्तेत राहून भाजपवर टीकेच्या फैरी झाडण्याची विरोधकाची भूमिका शिवसेना बजावत आहे. मात्र शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पहिलीच वेळ आहे. जनतेच्या जिव्हाळयाचे, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्‍नांवर बोलत राहणारच! सरकारमध्ये सामील असलो तरीही जनतेच्या हितापोटी राज्य सरकारला, केंद्र सरकारला झोडत राहणारच, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे भाव चढे राहिले आहेत.

पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. याचा जनतेच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होतो. या कारणावरून शिवसेनेने नागपूरपासून मुंबई शहरासह राज्यातील कानाकोपऱ्यात आंदोलन केले. रस्त्यावर उतरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे भाजप कात्रीत सापडला आहे. यापूर्वी जाहीर सभा, वृत्तपत्रांतून भाजपवर फटकारे शिवसेनेकडून ओढले जात होते. मात्र या रस्त्यावरील आंदोलनामुळे शिवसेनेची ही भूमिका भाजपला हैराण करणारी असल्याचे मानले जाते.