चंद्रभागेच्या तीरी वृक्ष लागवड

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सहभागी करून घेत चंद्रभागेच्या दोन्ही काठावर आंबा, पेरू, सीताफळ, चिंच, जांभूळ यासारख्या फळझाडांची लागवड करण्याचा सरकारचा विचार असून यादृष्टीने पुणे विभागीय आयुक्तांना एक सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व त्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना संस्थेमार्फत काढण्यात येणाऱ्या यात्रेची माहिती दिली. त्यांच्याशी चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले, 'शेकडो वर्षापासून चंद्रभागा नदी ही वारकऱ्यांसाठी केवळ नदी किंवा पाण्याचा स्त्रोत नाही, तर ती त्यांच्यासाठी पवित्र तीर्थ आहे. या नदीच्या शुद्धतेसाठी सरकारने "नमामि चंद्रभागा' अभियान हाती घेतले आहे. चंद्रभागा नदीची शुद्धता व्हावी, नदी प्रदुषण कमी होऊन लोकांमध्ये जलसाक्षरता वाढावी, या माध्यमातून नद्यांचे पुनरूज्जीवन व्हावे यासाठी सिंह यांची जलबिरादरी ही संस्था 24 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत जलयात्रा काढत आहे.