भुजबळ बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुंबई - ओशिवरा येथील तुळशी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भावेश बिल्डर्सचे संचालक पंकज व समीर भुजबळ आणि तत्कालीन म्हाडा अधिकारी अशा 17 जणांविरोधात आज गुन्हा दाखल केला.

मुंबई - ओशिवरा येथील तुळशी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भावेश बिल्डर्सचे संचालक पंकज व समीर भुजबळ आणि तत्कालीन म्हाडा अधिकारी अशा 17 जणांविरोधात आज गुन्हा दाखल केला.

ओशिवरा पोलिस ठाण्याशेजारी प्रस्तावित गृहनिर्माण संस्थेने 2001 मध्ये म्हाडाकडे अर्ज केला होता. म्हाडाने या जागेचे ताबापत्र 30 ऑक्‍टोबर 2002 मध्ये दिले. त्यानंतर येथील तुलशी गृहनिर्माण हाउसिंग सोसायटीने ही जागा पंकज व समीर भुजबळ संचालक असलेल्या भावेश बिल्डर्सला दिली. त्यावर भावेश बिल्डरने व्यावसायिक इमारत बांधून फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर भुजबळ, पंकज भुजबळ, म्हाडाच्या नियोजन विभागाचे तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ दीपक मांडलेकर (मृत), म्हाडाच्या मुंबई मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी सुभाष सोनावणे, म्हाडाचे तत्कालीन उपाध्यक्ष उत्तम खोब्रागडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे तत्कालीन सहमुख्य अधिकारी संजय गौतम, मुंबई मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी श्‍यामसुंदर शिंदे, मुंबई मंडळाचे तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ अनिल वेलिंग, मुंबई मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी सुरेश कारंडे, तत्कालीन सहायक भूव्यवस्थापक सूर्यकांत देशमुख, तत्कालीन भूमापक शिरीष शृंगारपुरे, म्हाडा प्राधिकरणाचे तत्कालीन सदस्य ताजुद्दीन मुजाहिद, संजय पराडकर (मृत), तुळशी गृहनिर्माण संस्थेचे प्रवर्तक प्रशांत सावंत, सरचिटणीस मुन्न सय्यद, सभासद अजिद वळुंज, तुकाराम पारकर अशा 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.