घरी पोचताच गहिवरले मुख्यमंत्री..!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - 'काळ आला होता; पण वेळ नव्हती...' अशा अत्यंत जीवघेण्या प्रसंगातून बचावलेले मुख्यमंत्री घरी पोहचता क्षणीच गहिवरले होते.

मुंबई - 'काळ आला होता; पण वेळ नव्हती...' अशा अत्यंत जीवघेण्या प्रसंगातून बचावलेले मुख्यमंत्री घरी पोहचता क्षणीच गहिवरले होते.

हेलिकॉप्टरच्या भयानक अपघातातून धीरोदात्तपणे सावरणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भावनांचा बांध मात्र वर्षा या निवासस्थानी पोचताच फुटला. सकाळी अपघात झाल्यानंतर तातडीने आई व पत्नीला संपर्क साधत सुखरूप असल्याचे कळवले होते. पण, त्यांच्या आई प्रचंड काळजीत होत्या. अत्यंत वाईट प्रसंगातून मुलगा बचावल्याचे समाधान असले, तरी हा एक धक्‍का मात्र त्यांना होताच.

लातूरहून मुख्यमंत्री दुपारी मुंबईत दाखल झाले. विशेष विमानातून येताना ते अत्यंत स्तब्ध अन्‌ भावुक झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ज्या वेळी मुख्यमंत्री घरी पोचले त्या वेळी मात्र त्यांचे डोळे पाणावले. आई व पत्नी यांना जवळ घेत त्यांनी ईश्‍वराचे आभार मानले. "आई तुझा आशीर्वाद होताच' असे म्हणत धीर देण्याचा प्रयत्नही केला. पण, अखेर मूल व आई या जिव्हाळ्याच्या संबंधात मुख्यमंत्री असल्याचे काही क्षण विसरत आईचे अत्यंत भावुक होत त्यांनी दर्शन घेतले. आज घरी गेल्यानंतर त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. कुटुंबासोबतच ते थांबले. अत्यंत वाईट प्रसंगातून मुख्यमंत्री सुखरूप असल्याने राज्यातल्या जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला. पण, त्यांच्या कुटुंबीयांना मात्र धक्‍का बसल्याचे चित्र होते. अखेर या अपघातातून बचावल्याने देवाचे आभार मानत मुख्यमंत्र्यानी आईचे आशीर्वाद घेतले.