त्याग जनतेचा, भोग मात्र मंत्र्याचा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

मुंबई - एकीकडे पंतप्रधान जनतेला गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन करतात, राज्याचे मुख्यमंत्री सधन शेतकऱ्यांनी कर्जमाफी नाकारावी असे सांगतात; मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्री स्वतःच्या मुलीसाठी शिष्यवृत्ती योजनेचा गैरफायदा उठवत आहेत, यातून भाजप सरकारचा दुटप्पीपणा व दांभिकपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याग केवळ जनतेने करावा आणि भोग मंत्र्यानी घ्यावा, अशी सरकारमधील परिस्थिती असल्याची टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती टाकल्यानंतर आज महाराष्ट्रातील गुणी व गरजू विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती ही सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलीला आणि सचिवाच्या मुलाला मिळत आहे. याच्यापेक्षा या सरकारचा दांभिकपणा व दुटप्पीपणा असू शकत नाही, असा टोला सावंत यांनी लगावला.

सरकारने राज्यातील गुणी व गरजू विद्यार्थ्यांना निवडून त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा असताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व त्या विभागाचे सचिव स्वतःच्या मुला-मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा आहे. या प्रकरणाचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

बडोले राजीनामा द्या - मुंडे
मुंबई - स्वतःच्या मुलीला स्वतःच्या खात्याची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळवून देऊन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बडोले यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सामान्य माणसांना गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन करणाऱ्या भाजप सरकारमधील मंत्री मात्र स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करीत आहेत, असे मुंडे यांनी सांगितले. गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींवर हा अन्याय असल्याचे सांगतानाच ही नव्याने निवड प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करणार का असा सवाल त्यांनी केला. "क्‍लीन चिट' देत मंत्र्यांना पुन्हा पाठीशी घालणार असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.