पाठ्यपुस्तकातील अवमानजनक उल्लेखावरून विधानसभेत गोंधळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या पुस्तकात माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याविषयी अवमानजनक माहिती प्रकाशित केल्याच्या मुद्यावरून बुधवारी विधानसभेत गोंधळ झाला.

मुंबई - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या पुस्तकात माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याविषयी अवमानजनक माहिती प्रकाशित केल्याच्या मुद्यावरून बुधवारी विधानसभेत गोंधळ झाला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. याबाबत ते म्हणाले, की इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही नेत्यांचे देशाप्रती मोठे योगदान आहे. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

इतिहासाच्या पुस्तकात या दोन्ही नेत्यांबाबत केलेले उल्लेख जाणीवपूर्वक प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने केल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित पुस्तकातून संबंधित परिच्छेद वगळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली.

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकविताना त्यात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो. तथापि, या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितले.

तावडे म्हणाले, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या 2000 सालापर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्याअनुषंगाने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास 2000 सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही. यामुळे अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले.