कॉंग्रेसची 'कात' टाकण्यास सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नव्याने कॉंग्रेसला संजीवनी देण्यासाठी धाडसी निर्णय घेण्यास पक्षाने सुरवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी पन्नास टक्‍के नव्या चेहऱ्यांना पक्षसंघटनेत सहभागी करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते.

त्यानुसार बारा विविध विभागांसंबधीचे सेल अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अखत्यारित येणारे राज्यातले सहा सेलदेखील बरखास्त करा, अशी शिफारस अशोक चव्हाण यांनी हायकमांडकडे केली आहे.

आजच्या निर्णयामुळे या बारा सेलच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सर्व पदे रिक्त झाली आहेत. लवकरच या रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या केल्या जाणार आहेत. तसेच लवकरच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून, त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

बरखास्त केलेले सेल
नागरी विकास, निराधार व निराश्रीत व्यक्ती विकास, असंघटित कामगार सेल, भटक्‍या जाती व विमुक्त जमाती, सफाई कामगार सेल, सामाजिक न्याय विभाग, उच्च तंत्रशिक्षण, शिक्षक, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सांस्कृतिक विकास, रोजगार व स्वयंरोजगार व कच्छी गुजरात सेल