शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल सुरू - राजकुमार बडोले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बॅंक खात्यात शिष्यवृत्तीसह शैक्षणिक शुल्क थेट जमा करण्यासाठी डीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी (ता. 9) दिली. याबाबतचा सरकारी आदेश काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात विधानसभेत या पोर्टलविषयी घोषणा करण्यात आली होती.

बडोले म्हणाले, की या पोर्टलद्वारे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काची फी, निर्वाहभत्ता, विद्यावेतनविषयक योजनांनुसार लाभ मिळवण्यासाठी अर्ज व त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. "आधार'शी जोडलेल्या बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमार्फत संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, तंत्रनिकेतने यांना विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदवता येईल. त्यानुसार किमान उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. लाभाची रक्कम मंजूर करून सक्षम प्राधिकाऱ्याकडून पहिला हप्ता हा संबंधित शैक्षणिक वर्षातील 31 ऑगस्टपर्यंत व दुसरा हप्ता 31 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. याबाबत सूचना डीबीटी पोर्टलमार्फत महाविद्यालयांना दिली जाईल, असे ते म्हणाले.