दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचे गूढ गेल्या 49 वर्षांत उलगडले नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उपाध्याय यांच्या गौरवाचा प्रस्ताव चर्चेला आला असता कॉंग्रेसने या संदर्भात प्रतिक्रिया दिली. या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले, की केंद्र व राज्य सरकार जनसंघाचे अध्यक्ष व सत्ताधारी भाजपचे आदर्श दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत आहे. देशातील रेल्वे स्थानकांचे दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने नामकरण करणे व त्यांचे पुतळे उभारण्याचे कार्यक्रम विविध राज्यांमधील भाजप सरकारने हाती घेतले आहेत. राज्याच्या विधिमंडळात त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा होत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या हत्येचे गूढ अजूनही उलगडलेले नसणे हे दुर्दैवाचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूची चर्चा आणि चौकशी करण्यात या सरकारने रस दाखवला. उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी देखील होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वाजपेयी सरकारच्या सहा वर्षांच्या कालखंडाप्रमाणे मोदी सरकारने त्यासंबंधी कोणतेही पाऊल उचलले नाही.

जनसंघाचे माजी अध्यक्ष बलराज मधोक यांना उपाध्याय यांच्या हत्येसंबंधी बरीच माहिती होती असे समजते. त्यांनी ही माहिती उघड केल्यानंतर पुन्हा चौकशी झाली नाही. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नातेवाईक व भाजप नेत्या मधू शर्मा यांनीही उपाध्याय यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करायला कोणतीही हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य सरकारतर्फे चौकशीची विनंती करावी, असे सावंत म्हणाले.