युतीतील तणाव शिगेला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 जून 2017

मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी

मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी
मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍वासात घेत नसल्याचा निषेध नोंदवला. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकता येत नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेत बैठकीतून बहिर्गमन केले. यामुळे शिवसेना व भाजपमधील तणाव शिगेला पोचल्याचे सूचित होत असून, शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशात असल्याने ते परत आल्यावरच पुढील दिशा ठरणार असल्याचे शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, त्या अगोदरच भारतीय जनता पक्षाने राज्यभरात कर्जमाफीच्या निर्णयाचे अभिनंदन करणारे फलक झळकावले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा कोणताही निर्णय न घेता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कुरघोडी केल्याचा रोष धरत शिवसेना आज आक्रमक झाली. शिवसेनेचे दिवाकर रावते, सुभाष देसाई व दीपक सावंत या मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि कर्जमाफीबाबत शिवसेना मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची विनंती त्यांनी केली तसेच मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्‍वासात घेत नाहीत, असा संताप करत त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. फडणवीस यांनीही त्यांना गैरहजर राहण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना सत्तेत आमच्या सोबतच असल्याचे स्पष्ट करत "जीएसटी'च्या निर्णयावर ज्या प्रकारे सर्वांना सोबत घेऊन निर्णय केला त्याच प्रकारे कर्जमाफीचाही निर्णय केला जाईल. भाजप-शिवसेना युती सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने शिवसेना सरकार सोबतच आहे, असे स्पष्ट केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातलेला नाही, असा खुलासा केला.

सरकार कर्जमाफीचा सविस्तर आराखडा स्पष्ट करत नाहीत व आमच्या नेत्यांना विश्‍वासात घेऊन चर्चा केली जात नाही, तोपर्यंत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणार नाहीत, असे दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

कर्जमुक्तीवरून शिवसेनेची नाराजी
विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून शिवसेनेने कर्जमुक्‍तीचे आश्‍वासन दिले होते; मात्र, ती घोषणा करण्यासाठी शिवसेनेला विश्‍वासात न घेतल्यामुळे शिवसेना कमालीची नाराज झाली आहे. शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप दुखावला गेला असला तरी, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपर्यंत शिवसेनेला नाराज करायचे नाही, असा पक्षाचा निर्णय आहे. भाजपने पुढे केलेल्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देत नाही, हा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे याही वेळी शिवसेना नेमके काय करेल, त्याबद्दल सांगणे कठीण आहे; मात्र या सहकारी पक्षाला अकारण दुखवायचे नाही, असा भाजपचा निर्णय आहे.

शेतकरी संपाला शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या बरोबरीने पाठिंबा दिला असल्याने राज्यातील भाजप नेते नाराज आहेत. मात्र, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जुळवून घ्या, असे सांगितले असल्याने आज कोणतीही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ही राज्यातील ज्येष्ठ मंडळी शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या मताची आहेत. त्यामुळे शिवसेनेने पूर्वसूचना देऊन घातलेला बहिष्कार म्हणजे पेल्यातील वादळ असल्याचे मानले जाते. 1995 मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील कुरबुरीचे पर्यवसान मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्यापर्यंत होत असे. फडणवीस सरकारच्या काळात असा प्रसंग प्रथमच आला आहे. मात्र, आमच्यात कोणतीही दरी नाही, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतात परतल्यावर पुन्हा संवादाचे पूल बांधले जातील, असे एका भाजप नेत्याने स्पष्ट केले.

भाजप-शिवसेना युती सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने शिवसेना सरकार सोबतच आहे.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

आमच्या नेत्यांना विश्‍वासात घेऊन चर्चा केली जात नाही, तोपर्यंत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणार नाहीत.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री व शिवसेना नेते

मंत्रिमंडळ निर्णय 
- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2016-17 मध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल 10 रुपये भरडाई दराऐवजी प्रतिक्विंटल 30 रुपये वाढीव भरडाई दरास मंजुरी. 
- राज्यातील शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील दंतशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक, दंतशल्यचिकित्सक या पदांवर विभागीय निवड मंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत उमेदवारांची सेवा नियमित करण्यास मंजुरी 
- राज्याच्या महाअधिवक्ता या पदावर आशुतोष कुंभकोणी यांच्या नियुक्तीची राज्यपालांना शिफारस करण्यास मान्यता. 
- उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यांसाठी उमरेड (जि. नागपूर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यास मान्यता 

शेतकरी संपाचे राज्यातील पडसाद 
- लातूरला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन 
- बीडमध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे मोर्चानंतर मुंडण आंदोलन, मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी. 
- माजलगाव (बीड) येथे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरासमोर "बोंबा मारो आंदोलन' 
- नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत येथील पोलिस ठाण्यावर शेतकऱ्यांचे लोटांगण घालत आंदोलन 
- शेतकरी समन्वयक समितीची उद्या (गुरुवारी) दुपारी नाशिकमध्ये तुपसाखरे लॉन्सवर बैठक 
- शिरवाडे फाटा (जि. नाशिक) येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार; वडनेर भैरव येथे शेतकऱ्यांना मारहाण 
- चांदोरी (जि. नाशिक) येथे भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 
- चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या "जिल्हा बंद'ला संमिश्र प्रतिसाद 
- गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन 
- वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात कडकडीत बंद; काही गावांत दूध, भाजीपाला रस्त्यावर 
- सिंधुदुर्गात शेतकरी आंदोलनाची सुरवात; मठमध्ये बंद ठेवून संपात सहभाग

मध्य प्रदेशातही शेतकरी आंदोलनाचा भडका 
मंदसोर येथे आंदोलक शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना धक्काबुकी 
बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई 
मंदसोर घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आदेश 
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंदसोर येथील शेतकऱ्यांना भेटणार 
कॉंग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव 
शेतकरी आंदोलनाचे कॉंग्रेसकडून राजकारण : नायडू