माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

दमानियांविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह विधान केले नाही
मुंबई - नाथाभाऊ तसे आवडते नाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे काही जणांना आनंदाचा क्षण वाटतो. मधल्या काळात बंद असलेली आरोपांची प्रक्रिया अंजली दमानिया यांनी सुरू केली आहे.

दमानियांविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह विधान केले नाही
मुंबई - नाथाभाऊ तसे आवडते नाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे काही जणांना आनंदाचा क्षण वाटतो. मधल्या काळात बंद असलेली आरोपांची प्रक्रिया अंजली दमानिया यांनी सुरू केली आहे.

राज्यात एवढे गंभीर विषय असताना त्यावर कधी प्रतिक्रिया आली नाही, अशी खंत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे व्यक्‍त केली. भाजप प्रदेश कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, या राज्यात कधी शेतकरी नसताना जमीन खरेदी केली, अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आला. त्यात तथ्य आढळून आले, असा अप्रत्यक्ष अंजली दमानिया यांच्यावर आरोप करीत खडसे म्हणाले, की सुनील तटकरे, अजित पवार यांच्यावर आरोप दाखल करून याचिका दाखल केल्या गेल्या. त्या मागेसुद्धा घेतल्या गेल्या, यामागचे कारण काय आहे, असा सवालही खडसे यांनी केला. नाथाभाऊंवर अनेक आरोप केले जातात. आरोप केल्याने प्रसिद्धी मिळते, असे सांगत खडसे म्हणाले, की मात्र अनेक आरोपांत चौकशीअंती काहीच बाहेर येत नाही. हेच माझ्या बाबतीत अनेकदा होत आले आहे.

आजवर आपण कुठल्याही स्त्रीचा अनादर केलेला नसून अंजली दमानियांविषयी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, असे सांगत खडसे म्हणाले, की दमानिया यांनी आपल्याविरोधात आरोपांची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांच्याशी कधी भेटही झालेली नाही किंवा भाषणात आपण कोणाचे नावही घेतले नाही आणि अशा स्थितीत प्रसिद्धीसाठी दमानिया यांनी विनयभंगाचा आरोप केला आहे.

चौकशीस तयार आहे - खडसे
आपल्याविरोधात दाऊदशी संभाषणाचा आरोप करण्यात आला; पण सरकारने चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य नसल्याचे आढळले. दुसरा आरोप पीएने लाच घेतल्याचा करण्यात आला. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक खाते व लोकायुक्तांनी चौकशी केली आणि आरोपात तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. जावयाने लिमोझिन गाडी घेतल्याचा आरोप करण्यात आला; पण चौकशीअंती त्यातही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. भोसरीत जमीन जावयाने नियमानुसार खरेदी केली आहे. कोणत्याही आरोपाबाबत चौकशीला आपण तयार आहोत, असे खडसे म्हणाले.